पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक जाणिवेतून दरवर्षी आरोग्य महाशिबिर आयोजित केले जात असून, या महाशिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी केले आहे.
सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. त्या अनुषंगाने देशमुख यांनी आपल्या मनोगतातून नागरिकांना आवाहन केले आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या महाशिबिरात मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नामवंत रुग्णालये व वैद्यकीय
तज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करून त्यांना
औषधोपचारही मोफत दिले जातात. त्याचबरोबर रुग्णांसाठी न्याहारी, भोजन, वाहतूक आदी चोख व्यवस्था केली जाते. महाशिबिराला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्याचे नियोजन नीटनेटके व्हावे यासाठी विविध 24 समित्या कार्यरत आहेत. डॉक्टर व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, स्वयंसेवक यांच्या मेहनतीने यंदाचेही महाशिबिर यशस्वी होईल, असा विश्वास शेवटी वाय. टी. देशमुख यांनी व्यक्त केला.