नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने रविवारी (दि. 24) नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात 245 गुणांच्या विश्वविक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना सौरभने या अविश्वसनीय कामगिरीसह 2020मध्ये होणार्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही जिंकले. 2016नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अंतिम फेरीत एकदाही पराभूत न होण्याचा सपाटा सौरभने लावला आहे. सौरभने सर्बियाच्या डॅमिक माकेस (239.3) आणि चीनच्या वेई पँग (215.2) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. मेरटमधील कलिना गावात सौरभचा जन्म झाला. सौरभच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. गावात वर्षातून एक जत्रा नक्की भरायची. त्यासाठी हा पठ्या पैसे साठवायचा, कारण त्याला जत्रेत फुगे फोडायचे प्रचंड वेड होते. तो जत्रेत फुगे फोडायला गेला की बक्षिस नक्कीच जिंकणार, ही त्याच्या घरच्यांनाही खात्री होती. त्यानेही घरच्यांना कधीच निराश केले नाही. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत सौरभ शेतीचे काम करीत होता.