गव्हाण ः रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11वी कला व वाणिज्य शाखेमध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व स्वागत सोहळा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय वर्तनातून उत्तुंग ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यासू वृत्तीची जोपासना करण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी विद्यार्थांना शुभेच्छा देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत आघाडीवर असणारे विद्यालयाचे आधारस्तंभ संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष गौरवोल्लेख केला. 12 वी ची विद्यार्थिनी फिजा शेख हिने इंग्रजीतून भाषण केले. या वेळी स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक तथा संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग, रयत को-ऑप. बँकेचे संचालक तथा संस्थेचे लाइफ वर्कर प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग प्रयोगशाळाप्रमुख रवींद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. जे. ई. ठाकूर व प्रा. अर्चना पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजू खेडकर यांनी केले, तर प्रा. एम. के. घरत यांनी आभार मानले.