Breaking News

पनवेलचा वीजप्रश्न सुटणार

शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र होणार कार्यान्वित

आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न लागणार सार्थकी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी बांधण्यात आलेले उपकेंद्र पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आग्रहास्तव राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या जनता दरबारानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पनवेलचा वीजप्रश्न सुटणार आहे.

पनवेल शहराला वीजपुरवठा करण्यासाठी ओएनजीसी येथील उपकेंद्रावरून वीज आणली जाते, मात्र भिंगारी येथून येणार्‍या विद्युत वाहिनीवर क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडतात. ओएनजीसीवरून येणार्‍या दोन वाहिन्या अतिशय जीर्ण असून, गेल्या काही वर्षांत पनवेलचा झालेला विकास पाहता त्या अपुर्‍या पडत होत्या. पनवेलमधील विजेचा प्रश्न सुटावा याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करून त्यांचा जनता दरबार पनवेलमध्ये आयोजित केला होता. त्यानुसार कार्यवाही झाली आहे. शहरातील 42 हजार वीजग्राहकांचा विचार करून गॅस इन्सुलेटेड उपकेंद्राला परवानगी देऊन निधी मंजूर करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2018मध्ये सुरू झालेले काम आता पूर्ण झाले आहे.

ओएनजीसी येथून कोळखे, नेरे, पारगाव कर्नाळा आणि गव्हाण फिडरवर वीजपुरवठा केला जातो. मुख्य वाहिनीवर बिघाड झाल्यावर पनवेल शहर, ग्रामीण भागात वीज खंडित करावी लागत होती. स्वतंत्र उपकेंद्र तयार झाल्यानंतर इतर फिडर आणि पनवेल शहराचा बिघाड यांचा एकमेकांशी संबंध येणार नाही. महावितरण कंपनीने गॅस इन्सुलेटेड प्रकारचे तयार केलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच अत्याधुनिक उपकेंद्र आहे.

महावितरण कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पनवेलमधील उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या उपकेंद्रावरून वीजजोडणी सुरू करण्यासाठी आठ फिडरची जोडणी करावी लागणार आहे. यासाठी पनवेलमध्ये एका दिवशी बराच काळ वीजजोडणी खंडित करावी लागणार आहे. यादरम्यान पनवेलकरांनी महावितरणला सहकार्य करण्याची अपेक्षा अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

अत्याधुनिक यंत्रणा

साडेतीन किलोमीटरची वीजवाहिनी भूमिगत करून पनवेल उपविभागीय कार्यालयाच्या मागील बाजूला गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र उभारण्यात आले आहे. शहरात सध्या तीन फिडरच्या माध्यमातून वितरित होणारी वीज नव्या यंत्रणेमुळे आठ फिडरच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. त्यासाठी 10 एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफार्मर लावण्यात येणार आहेत. पुढील 10 वर्षांचा वाढणारा वीजभार लक्षात घेऊन ही अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply