Breaking News

एक्स्प्रेस वेवर सहा वाहनांचा अपघात

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच असून खंडाळा घाटात सोमवारी (दि. 18) पहाटे सहा वाहनांचा विचित्र व भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टेम्पोचालकाचे तीव्र उतारावर वाहनवरील नियंत्रण सुटल्याने तो समोरील भाजीच्या टेम्पोवर मागून आदळला. या धक्क्याने भाजीचा टेम्पो पुढच्या कारवर आदळला. टेम्पोच्या धडकेने ही कार कोंबड्यांची वाहतूक करणार्‍या टेम्पोवर मागून आदळली, तर तो कोंबड्याचा टेम्पो पुढे एका प्रवासी बसवर जोरात आदळला. त्याच वेळी दुसरी एक हुंदाई कार कोंबड्यांची वाहतूक करणार्‍या टेम्पोवर आदळल्यावर ती कार मागून येणार्‍या ट्रेलर आणि कोंबड्यांची वाहतूक करणार्‍या टेम्पोच्या मध्ये चिरडली. या अपघातात हुंदाई कारचा चालक, अन्य एक जण आणि कोंबड्यांची वाहतूक करणार्‍या टेम्पोचा चालक असा तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कारमधील इर्शाद सिद्दीकी (वय 32, रा. वांद्रे प. मुंबई), रोनक मोरदानी (वय 2, रा. खार, मुंबई) आणि टेम्पोचालक (नाव, गाव समजले नाही) यांचा समावेश आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. बोरघाट व खोपोली वाहतूक पोलीस, आयआरबी, डेल्टा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते, लोकमान्यची टीम एवढ्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना बाहेर काढले, तसेच वाहतूक सुरळीत केली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply