पेण ः तालुक्यातील तुकारामवाडी-पंचक्रोशीमधील श्री गणेश क्रिकेट संघ तुकारामवाडी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. संघाचे अध्यक्ष आणि संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. दिवसेंदिवस निसर्गाचा होत असणारा र्हास आणि वातावरणातील बदल या गोष्टींचा विचार करून वृक्षारोपण करणे आणि त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करणे, या उद्देशाने देशासह महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणार्या खेड्यापाड्यातल्या आणि शहरातल्या सामाजिक संस्था त्यापैकी खेड्यातील छोटासा सहभाग घेत गणेश क्रिकेट संघ तुकारामवाडी यांच्या वतीने ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वढाव हद्दीतील तुकारामवाडी येथे जांभूळ, कडुनिंब आदी प्रकारच्या वृक्षाची लागवड करूनही झाडे लावून ती मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्याचा मानस संघाच्या वतीने करण्यात आला.
भात लावणीच्या कामांना वेग
रोहा : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रोहा तालुक्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लावणीची खोळंबलेली कामे पुन्हा सुरू झाली आहेत. दमदार पाऊस बरसू लागल्याने भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून शेतात लावणीसाठी आवश्यक मुबलक पाणी साठू लागले आहे. त्यामुळे यंदा उत्पन्न येण्याची अपेक्षा बळीराजाला आहे. पावसाळी हंगामात भात लावणीसाठी मुबलक पाणी मिळाले तर भाताचे पीक चांगले येते. यंदा पावसाचे प्रमाण व एकंदरच परिस्थिती अनुकूल असल्याने चांगले पीक येण्याची शक्यता शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
वनहक्काचे 1126 दावे अमान्य
अलिबाग : रायगड जिल्हा प्रशासनाने 18 हजार 703 वनहक्क दाव्यांपैकी सहा हजार 326 वनहक्क दावे मान्य करत तब्बल एक हजार 126 वनहक्क दावे अमान्य केले आहेत. त्यामुळे आता ज्यांचे दावे फेटाळण्यात आले आहेत त्यांना न्यायालयात जाण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत लवकरच दिशा ठरवण्यासाठी सामाजिक संघटनांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. वनवासी अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासींकरिता वनहक्क कायदा करण्यात आला होता. ज्यांचे वास्तव्य पिढ्यान्पिढ्या जंगलात असतानाही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद घेतली गेली नाही अथवा अधिकारांना मान्यता दिली गेली नाही असे वनहक्क न्याय्यपणे नोंदवून त्याचे अभिलेख तयार करण्याची रचना निर्माण करून त्यासाठी आवश्यक अशा विविध पुराव्यांचे स्वरूप सुनिश्चित करण्याची हमी या कायद्यामुळे निर्माण झाली आहे. वनहक्कांमध्ये संसाधनाचे शाश्वत वापरासाठीचे अधिकार व जबाबदारी यांचा समावेश होतो. तसेच वापराच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करण्याचे अधिकार गाव समाजाला देऊन वनव्याप्त क्षेत्रांची विकास प्रक्रिया मजबूत केली आहे. त्याचवेळी त्यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक जनतेची उपजीविका व अन्न सुरक्षा यांची खात्री या कायद्याने प्राप्त झाली आहे.