Breaking News

धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

मुंबई ः प्रतिनिधी

2019 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात मात्र आपण खेळणार नसल्याचे धोनीने निवड समितीला कळवले आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात निवडायचे की नाही, हा निर्णय निवड समितीनेच घ्यावा, असा संदेश धोनीने निवड समितीला दिलेला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद आणि धोनी यांच्यात रविवारी अनौपचारिक चर्चा झाल्याचे कळते. या चर्चेत प्रसाद यांनी आगामी काळात निवड समिती तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असल्याचे धोनीला सांगितले आणि यानंतरच आगामी काळात मर्यादित षटकांच्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून धोनी पहिली पसंती नसेल असे ठरवण्यात आले. बीसीसीआय आता ऋषभ पंतला अधिकाधिक सामने खेळायला देण्याच्या तयारीत आहे. 2023 साली आगामी वन डे विश्वचषक खेळवला जाणार आहे. तोपर्यंत धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल याची शक्यता कमीच आहे, मात्र 2020 साली ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषकासाठीही निवड समिती धोनीचा विचार करेल याची खात्री देता येत नसल्याचे समजते. धोनीनेही दोन महिन्यांनंतर आपली संघात निवड करायची की नाही, याचा निर्णय निवड समितीवर सोपवला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply