एकाच शुक्रवारी दोन वा तीन चार मराठी चित्रपट प्रदर्शित झाले की हमखास त्यावरून उलटसुलट चर्चा होणं अगदी स्वाभाविक. आताही असेच दशावतार; बिन लग्नाची गोष्ट व आरपार असे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यावर चर्चा झाली. सुदैवाने हे सर्व चित्रपट लोकप्रिय ठरलेत आणि मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘जिवाचा सखा आणि ’गरिबांचे राज्य’
एकाच शुक्रवारी दोन वा तीन चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणे अजिबात नवीन नाही. यापूर्वीदेखील घडलेय… नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. नवीन उत्साह, नवीन उर्जा. नवीन आशा आणि त्याच दिवशी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित असा योग. 1 जानेवारी 1949 हा तो दिवस. त्या दिवशी राजा परांजपे दिग्दर्शित जिवाचा सखा आणि मा. छोटू व शं.वि. तुंगे दिग्दर्शित गरिबांचे राज्य हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मंगल पिक्चर्स या बॅनरखाली निर्माण झालेला राजा परांजपे दिग्दर्शित जिवाचा सखा हा चित्रपट मुंबईत मॅजेस्टीक (गिरगाव) येथे प्रदर्शित झाला. हा चित्रपट 7 डिसेंबर 1948 रोजी सेन्सॉर संमत झाला. मुंबईनंतर पुणे शहरात हा चित्रपट 25 जानेवारी 1949 रोजी मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाचे निर्माते वामनराव कुलकर्णी आणि विष्णुपंत चव्हाण हे आहेत. म.मा. भोसले यांच्या ’उघड्या जगात’ या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद व गीते ग.दि. माडगूळकर यांची असून संगीत सुधीर फडके यांचे आहे. छायाचित्रण वसंत बेलतंगडी यांचे असून संकलन राजा ठाकूर यांचे आहे.
जिवाचा सखा या चित्रपटात जयराम शिलेदार, सुलोचना, दादा साळवी, सरोज बोरकर, विष्णुपंत जोग, राजा परांजपे, शकुंतला जाधव, चंद्रकांत गोखले, पुष्पा आंबेडकर, रवींद्र, सुबोधिनी, धुमाळ, वसंत शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सामाजिक चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनी, पुणे येथे झाली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग.दि. माडगूळकर या त्रयीचा हा पहिला चित्रपट. ‘जिवाचा सखा’पासून जमलेले हे त्रिकूट 1969च्या आधार या चित्रपटापर्यंत एकत्र होते, पण आता सुधीर फडके आणि ग.दि. माडगूळकर यांच्यातील सलोखा काही कारणास्तव संपला होता. हे दोघे दादरच्या शंकर निवासमध्ये शेजारी शेजारी राहत. अगोदर माडगूळकर यांची खोली आणि मग सुधीर फडके यांची खोली. त्यामुळेच सुधीर फडके यांच्याकडे कोण आले हे सुधीर फडके यांना समजत असे. ‘आधार’नंतर राजा परांजपे हे दिग्दर्शनापासून दूर झाले आणि त्यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित केले.
मयूर पिक्चर्स लिमिटेडच्या शं.वि. तुंगे आणि प्र.व्यं. सोहनी निर्मित गरिबांचे राज्य या चित्रपटाची कथा वि.म. कुलकर्णी यांची असून पटकथा व संवाद ग.ल. ठोकळ यांचे आहेत. बाबूराव गोखले यांच्या गीतांना दादा चांदेकर यांचे संगीत आहे. या चित्रपटात मा. छोटू, मा. विठ्ठल, कुमार विजय, उषा मंत्री, चित्तरंजन कोल्हटकर, बेबी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण दहा गाणी आहेत हे विशेषच.
‘भाग्यलक्ष्मी‘ व ‘क्षण आला भाग्याचा’ एकाच शुक्रवारी
मराठीत सामाजिक चित्रपटांची खूपच मोठी परंपरा आहे. पूर्वीचे सामाजिक सांस्कृतिक वातावरण, कौटुंबिक नातेसंबंध तसेच होते आणि त्या काळाला अनुसरून पूर्वी मराठी चित्रपट निर्माण होत. ऐन श्रावणात म्हणजेच 26 ऑगस्ट 1962 रोजी मुंबईत सागर चित्र निर्मित क्षण आला भाग्याचा हा चित्रपट गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह आणि दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात, तर अनंत चित्र निर्मित भाग्यलक्ष्मी चित्रपट लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. क्षण आला भाग्याचा या चित्रपटाचे निर्माते दत्ता कुलकर्णी होते, तर दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांचे आहे. कथा पटकथा व संवाद मधुसूदन कालेलकर यांचे आहेत. गीते मधुकर जोशी यांची असून संगीत राम कदम यांचे आहे. या चित्रपटात राजा परांजपे, सुमती गुप्ते, रमेश देव, वंदना, उमा बाळकराम, राम टिपणीस, मधु आपटे, धुमाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील आला गं आला श्रावण महिना हे गाणे लोकप्रिय ठरले. विशेष उल्लेखनीय गोष्ट ऊन पाऊस’ या चित्रपटानंतरचा राजा परांजपे व सुमती गुप्ते या जोडीचा हा चित्रपट आहे. ऊन पाऊस या चित्रपटाच्या अगोदर मराठी चित्रपटात तरुणाईच्या गोष्टी असत. ऊन पाऊसने म्हातारपण दाखवले. म्हातारपणातील सुख दु:ख, मुले व सूनांकडून येणारे अनुभव अशी गोष्ट त्यात दाखवली आणि ती प्रेक्षकांना आवडली.
भाग्यलक्ष्मी या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक अनंत माने यांचे आहे. या चित्रपटाची कथा ना.ग. करमरकर यांची असून पटकथा व संवाद व्यंकटेश माडगूळकर यांची आहे. शांता शेळके यांच्या गीताना राम कदम यांचे संगीत आहे. या चित्रपटात जयश्री गडकर, रमेश देव, सुमती गुप्ते, लता काळे, दामूअण्णा मालवणकर, इंदिरा चिटणीस, विवेक, राजा गोसावी, शरद तळवळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील जयदेवी मंगळागौरी हे गाणे लोकप्रिय ठरले. भाग्यलक्ष्मी या चित्रपटाचे विशेष म्हणजे दिग्दर्शक अनंत माने यांना जयश्री गडकर गुरूस्थानी मानत. अनंत माने दिग्दर्शित 1959 सालच्या ‘सांगते ऐका’पासून 1975च्या ‘पाच रंगाची पाच पाखरे’ या चित्रपटापर्यंत अशा वीस चित्रपटात जयश्री गडकर यांनी भूमिका साकारली. जयश्री गडकर अनंत माने यांच्याबद्दल म्हणाल्या होत्या, त्यांच्यातील समर्थ दिग्दर्शकाची, त्यांच्या प्रतिभेची चांगली ओळख झाली होती. त्यांना नेमके काय हवे हे मी जाणून होते. माझ्या गाजलेल्या बहुसंख्य चित्रपटाचे माने हेच दिग्दर्शक आहेत असे जयश्री गडकर यांचे म्हणणे होते.
‘एकटा जीव सदाशिव’ व ‘पिंजरा’ पुणे शहरात एकाच शुक्रवारी प्रदर्शित
दादा कोंडके यांचा सोंगाड्या (1971) नंतरचा चित्रपट एकटा जीव सदाशिव आणि हा चित्रपट 31 मार्च 1972 रोजी पुणे शहरातील अलका थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच तारखेला पुणे शहरात चित्रपती व्ही. शांताराम निर्मित आणि दिग्दर्शित पिंजरा प्रभात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना रसिकांनी पहिल्याच शोपासून हाऊसफुल्ल गर्दीत प्रतिसाद दिला. ‘सोंगाड्या’ची कथा पटकथा संवाद लिहिणारे वसंत सबनीस यांनीच ‘एकटा जीव सदाशिव’चे लेखन केले आहे. ‘सोंगाड्या’चेच दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘सोंगाड्या’प्रमाणेच याही चित्रपटाचे शूटिंग कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओत झाले. ‘सोंगाड्या’चेच नायक आणि नायिका अर्थात दादा कोंडके आणि उषा चव्हाण तसेच नायकाची आई रत्नमाला यांच्या या चित्रपटातही भूमिका. यासह या चित्रपटात गुलाब कोरगावकर, सुमन जगताप, मधु आपटे, शरद तळवळकर, बिपीन तळपदे, सरोज सुखटणकर, बी. माजनाळकर, भालचंद्र कुलकर्णी, गुलाब मोकाशी, मधु भोसले, वसंत खेडेकर इत्यादींच्या भूमिका आहेत. या चित्रपटात चार गाणी असून ती दादा कोंडके आणि जगदीश खेबूडकर यांनी लिहिली असून संगीत राम कदम यांचे आहे. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी ही गाणी गायली आहेत. नग चालूस दुडक्या चाली, लबाड लांडग ढोंग करतेय, काल रातिला सपान पडलं, वर आभाळ खाली धरती ही ती गाणी आहेत. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन सदाशिव गायकवाड, छायाचित्रण शंकरराव सावेकर आणि संकलन एन.एस. वैद्य यांचे आहे. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत.
‘पिंजरा’ मुंबईत 14 एप्रिल 1972 रोजी प्रदर्शित झाला, तर ’एकटा जीव…’ मुंबईत 1972 नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली सातारा इचलकरंजी इत्यादी अनेक ठिकाणी टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत आपली लोकप्रियता वाढवत राहिला. ‘एकटा जीव…’ची दिग्दर्शक महेश मांजरेकरने ‘जिस देश मे गंगा रहता है’ या नावाने रिमेक केली. त्यात गोविंदा आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, पण या चित्रपटाला मूळ चित्रपटाची रंगत आली नाही. याचे कारण म्हणजे, ‘एकटा जीव…’मधील दादा कोंडके यांच्या भाबड्या व्यक्तिरेखा व धांदरटपणा यांच्याशी प्रेक्षक जोडले गेले आणि चित्रपट आवडला. अर्थातच, तेव्हा चित्रपट रसिकांनी ‘पिंजरा’ आणि ‘एकटा जीव सदाशिव’ हे दोन्ही चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले… आजही हे दोन्ही चित्रपट पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.
मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी आणि चौफेर वाटचालीतील माईलस्टोन म्हणून ओळखला जात असलेला चित्रपट म्हणजे व्ही. शांताराम प्रॉडक्शन्सचा ’पिंजरा’. त्याचा आशय, सादरीकरण, अभिनय, गीत संगीत व नृत्य यांच्या गुणांवर या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता संपादली. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक चित्रपती व्ही. शांताराम हे आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला यशस्वी रंगीत सिनेमा म्हणूनसुद्धा पिंजरा या चित्रपटाची विशेष ओळख आहे. ‘पिंजरा’.. त्यो कुनाला चुकलाय? अवो मानसाचं घरतरी काय असतं? त्योबी एक पिंजराच की, हे तत्त्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि ‘व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’ या महान तत्त्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची कथा ‘पिंजरा’ चित्रपटात अतिशय उत्कटतेने आणि प्रभावीपणे साकारलीय. चंद्रकला (संध्या) आणि गुरुजी (डॉ. श्रीराम लागू) यांच्यावर चित्रीत झालेले प्रत्येक दृश्य आणि संवाद सिनेरसिकांच्या आजही लक्षात आहे. प्रत्येकाच्या मनःपटलावर पिंजरा कलाकृतींच एक वेगळंच स्थान आहे. डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले, वत्सला देशमुख यांच्या यांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट उंचीवर नेऊन ठेवला. या कलाकारांसोबतच या चित्रपटात माणिकराज, गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, सरला येवलेकर, आबू, भालचंद्र कुलकर्णी, बर्चीबहाद्दर इत्यादींच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा अनंत माने यांची आहे, तर संवाद शंकर पाटील यांचे आहेत.
’पिंजरा’ ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजर्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक व सामाजिक अध:पतनाची कथा आहे. या चित्रपटातील गीते जगदीश खेबूडकर यांची आहेत, तर संगीत राम कदम यांचे आहे. या चित्रपटातील आली ठुमकत नार, दे रे कान्हा चोळी आणि लुगडी, छबीदार छबी मी तोर्यात उभी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, मला इष्काची इंगळी डसली, दिसला गं बाई दिसला, कशी नशिबानं थट्टा आज मांडली ही आणि अन्य सर्व गाणी/लावण्या आजही लोकप्रिय आहेत. रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही ही गाणी आणि चित्रपट लोकप्रिय आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण शिवाजी सावंत यांचे, कला दिग्दर्शन बाबूराव जाधव, नृत्य दिग्दर्शन रंजन साळवी यांचे आहे. चित्रपटाचे सगळे शूटिंग कोल्हापूरच्या शांतकिरण स्टुडिओत झाले. पुणे शहरानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी अनेक शहरात, ग्रामीण भागात हा चित्रपट प्रदर्शित होत गेला.
‘पिंजरा’च्या खणखणीत यशानंतर मराठीत रंगीत चित्रपटांचे युग हळूहळू मुरत गेले तरी वर्षभरातील सगळेच मराठी चित्रपट रंगीत होण्यास जवळपास एक दशक लागले. ‘पिंजरा’च्या अगोदर व्ही. शांताराम यांनीच 1965 साली इथे मराठीचिये नगरी या चित्रपटाचे चित्रिकरण इस्टमनकलर या रंगसंगतीनुसार केले होते, पण या चित्रपटाला रसिकांनी नाकारले.
दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper