Breaking News

श्रीमंती नाही, तर समाजसेवा महत्त्वाची : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यामुळे श्रीमंती महत्त्वाची नाही, तर समाजसेवा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले.

सिडको अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 21) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, प्राचार्य वसंत बर्‍हाटे आदी उपस्थित होते. बैठकीस लोकप्रतिनिधी, विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, सामाजिक, आरोग्य, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक असे विविध उपक्रम आपण वर्षभर सातत्याने राबवत असतो. या उपक्रमांत पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, हितचिंतकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभत असते. म्हणूनच असे उपक्रम यशस्वी होत असतात. समाजसेवेतून मनाला समाधान लाभते. राजकारणापेक्षा आपण समाजकारणाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे आपल्या कार्याला समाजाने स्वीकारले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्व काम करीत असून आमदार प्रशांत ठाकूर सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेची कामे करीत असल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी केला. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही. त्यासाठी उपाय म्हणून आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य महाशिबिर दरवर्षी आयोजित करतो. वर्षभर होत असलेल्या कार्यक्रमांत हा आपला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे त्याच्या यशस्वितेसाठी सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या 24 समित्यांनी आपापल्या समितीच्या कामाचा आढावा सादर केला. या अनुषंगाने प्रत्येक कमिटीने स्वतंत्रपणे बैठक घेण्याची सूचना करण्यात आली असून सर्व समित्यांची पुढची बैठक 25 जुलैला होणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply