Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांविनाच!

पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णांचे उपचारासाठी हेलपाटे

पोलादपूर : शैलेश पालकर – रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या पोलादपूर तालुक्यातील पिंपळवाडी आणि पळचिल या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांचीदेखील बदली झाली आहे. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

पळचिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तरीदेखील तेथील प्राथमिक शाळेच्या इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेवा नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्या नाहीत. अलीकडे या केंद्रात डॉक्टरही नाहीत. त्यामुळे पळचिल परिसरातील वाड्या आणि वस्त्यांतील रुग्णांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी (ता. खेड) उपजिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे.

अनेकदा पाठपुरावा करूनदेखील पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोयी दूर होऊ शकल्या नाहीत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर घोडके यांची बदली झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांच्या तोंडी सूचनेनुसार डॉ. घोडके यांच्या डॉक्टर पत्नी या आरोग्य केंद्रात बाह्यरुग्णांवर उपचार करीत असल्याचे दिसून येते. त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच स्वत:चा दवाखाना आहे. याविषयी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांनी सांगितले की, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण केलेली विनंती मान्य करून बदली झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडके यांच्या डॉक्टर पत्नी पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागात रोज दोन तास काम करतात. त्या निघून गेल्यानंतर परिचारिकाच रुग्णांवर औषधोपचार करीत असतात.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply