Breaking News

महामार्गावर पडलेल्या गंधकाने घेतला पेट

महाड : प्रतिनिधी – मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. त्यावेळी ट्रकमधील गंधकाची पावडर रस्त्यालगत पसरली होती. या घटनेला महिना उलटला तरीही हे गंधक काढण्यात आले नव्हते. या गंधक पावडरने रविवारी (दि. 21) अचानक पेट घेतला. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. नदी आणि महामार्गाच्या मध्ये पडलेल्या या गंधक पावडरकडे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाजवळ 22 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक पलटी झाला होता. यामध्ये दोघे जण जखमी झाले होते, तर ट्रकमधील गंधक महामार्गावर पसरला होता. या घटनेला एक महिना झाला तरीदेखील संबंधित ट्रकमालक, कंपनी, पोलीस आणि प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. केवळ अपघातग्रस्त ट्रक उचलून नेण्यात आला होता, मात्र पिवळ्या रंगाचा गंधक तिथेच पडून राहिला. रविवारी सकाळी या गंधकाने अचानक पेट घेतला.

स्थानिक ग्रामस्थांकडून या घटनेची माहिती समजताच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला  पाचारण केले, मात्र पाण्याशी संपर्क आल्याने या गंधकाने अधिकच पेट घेतला. यामुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार कंपनीकडून माती मागवण्यात आली आणि ही माती वरून टाकण्यात आली. यामुळे गंधकाला लागलेली आग आटोक्यात आली. नायब तहसीलदार अरविंद घेमूड यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply