Breaking News

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडको गृहनिर्माण, उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना दिली भेट

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश

सिडको वृत्त:
सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडको गृहनिर्माण साईट्स तथा उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी सिडकोच्या या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई) एन. सी. बायस आणि मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ/विशेष प्रकल्प) श्रीमती शीला करुणाकरन यांसह प्रकल्पांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी घर बांधणीची गुणवत्ता उत्तम ठेवण्यावरदेखील भर दिला. सिडकोने योग्य वेळेत चांगल्या दर्जाची घरे जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विजय सिंघल यांनी एक आठवड्यापूर्वी सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य महत्त्वाच्या प्रकल्प स्थळांना भेट दिली होती. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी १४ मार्च २०२४ रोजी मानसरोवर गृहनिर्माण प्रकल्प, नावडे व तळोजा गृहनिर्माण प्रकल्प, सेंटर ऑफ एक्सलन्स, सेंट्रल पार्क, खारघर तुर्भे बोगदा जोड मार्ग, खारघर गोल्फ कोर्स आणि खारघर गृहनिर्माण प्रकल्प या प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या सद्यस्थितीविषयी चर्चा केली व प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता निर्देश दिले.

“सिडकोचे गृहनिर्माण प्रकल्प हे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीकोनातून नियोजित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबईला जागतिक दर्जाची क्रीडा नगरी बनवण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फुटबॉल स्टेडियम व खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा १८ होल्समध्ये विस्तार, या प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे. खारघर-तुर्भ बोगदा जोड मार्ग हा प्रकल्प परिवहन व कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. या व अन्य प्रकल्प स्थळांना भेट देऊन प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व नियोजित वेळेत व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.-
विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply