
अलिबाग ः जिमाका
अलिबाग तालुक्यातील विकासकामांबाबत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, असे
निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, महेश मोहिते आदी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष्य निर्धारित करून काम करावे, अशा सूचना चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिल्या. योजनांची सर्वसामान्य माणसाला माहिती व्हावी यासाठी अधिकाधिक प्रचार-प्रसिध्दी मोहीम राबवावी. या वेळी चव्हाण यांनी अलिबागच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, एसटी महामंडळ, पाणीपुरवठा, विद्युत मंडळ, मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आदी शासकीय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबतचा आढावा घेतला. बैठकीच्या प्रारंभी अलिबागमधील मान तर्फे झिराड ग्रामपंचायत अंतर्गत मानीगाव येथील सिमेंट बंधारे लोकार्पण व जलपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.