अलिबाग : प्रतिनिधी
अल्पवयीन चुलत बहिणीवरच बलात्कार करणार्या आरोपीस अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास, तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. निमेश मोहन म्हात्रे (वय 21, रा. कोप्रोली, ता. उरण) असे या आरोपीचे नाव आहे. नात्याने चुलत बहीण असलेल्या पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला ठार मारण्याची धमकी देऊन निमेशने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. याप्रकरणी पीडितेच्या आईने आरोपी निमेश मोहन म्हात्रे याच्याविरुद्ध उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या गुन्ह्याचा तपास करून उरण पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. या वेळी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यात पीडित मुलीची, तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली, तसेच डीएनए अहवाल महत्त्वाचे ठरले. पोलीस उपनिरीक्षक एम. जी. वाघमोडे, सहाय्यक निरीक्षक एस. जी. काठे यांनी केलेला तपास महत्त्वाचा ठरला. न्यायालयासमोर दाखल केलेले उच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय व युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपी निमेश मोहन म्हात्रे यास दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.