
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत रविवारी (दि. 17) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 62 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1190 झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवसात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सात दिवस बंद केल्याने काही प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ती फोल ठरताना दिसत आहे. तर परप्रांतीय आपल्या राज्यात परत जात असल्याने देखील रविवारचा आकडा कमी होत असल्याचे बोलले जाते. आजतागायत 8360 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून एकूण 6434 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही 736 अहवाल प्रलंबित आहेत. रविवारी पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह अहवाल येऊन 42 व्यक्ती बर्या झाल्या असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ही संख्या 409 झाली आहे. रविवारी बाधितांची विभागवार अकडेवारी लक्षात घेतल्यास बेलापूर 1, नेरुळ 4, वाशी 4, तुर्भे 23, कोपरखैरणे 20, घणसोली 4, ऐरोली 5 व दिघा 1 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.