कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; दुकानांच्या वेळांतही बदल
नवी मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर कमी होत असतानाच नवी मुंबई शहरातील दैनंदिन रुग्णसंख्याही 50पेक्षा कमी झाल्याने शहरातील कोरोना निर्बंध उठविण्यात आले होते, मात्र मागील आठ दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्यात डेल्टा प्लसचा संभाव्य धोका असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेने सोमवार (दि. 28)पासून शहरात पुन्हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी उशिरापर्यंत कोरोनाविषयक नियमावली तयार करण्याचे काम सुरू होते, मात्र सोमवारपासून हे निर्बंध लागू होतील. यात मॉल्स, चित्रपट व नाट्यगृहे बंद राहणार असून दुकानांच्या वेळांतही बदल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या शंभरपेक्षा अधिक झाली असून गुरुवारी शहरात 137 रुग्ण आढळले होते, तर उपचाराधिन रुग्णांची संख्याही 1,369पर्यंत गेली आहे.
गेल्या आठवडाभरापासून दोन अंकी असलेली दैनंदिन रुग्णसंख्या तीन अंकी झाली आहे. उपचाराधिन रुग्णांची संख्याही दीड हजारांच्या वर गेली आहे. ही रुग्णवाढ राज्यातही सुरू असल्याने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना परिस्थितीनुसार निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सोमवारपासून हे निर्बंध लागू करण्याचे ठरविले आहे. शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून तिसर्या टप्प्यातील नियमावलीनुसार कडक निर्बंध लागणार आहेत. यापूर्वीच्या नियामवलीत आता बदल होणार असून त्यानुसार मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच इतर दुकानांच्या वेळांमध्येही बदल केले जाणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. नवी मुंबई शहरात शुक्रवारी 130 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाबधितांची एकूण संख्या 1,00,109 झाली आहे. शुक्रवारी कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.