पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल, नवीन पनवेलमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी
करून नागरिकांना धीर दिला.
पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गाढी नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पनवेल आणि नवीन पनवेलमध्ये काही ठिकाणी पाणी जमा झाले. त्याचा परिणाम जनजीवन आणि वाहतुकीवर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नगरसेवकांनी पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पनवेल शहरासह परिसरातील नदीकाठच्या गावांना, तसेच नागरी वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.