Breaking News

अडीच लाखांची फसवणूक

पनवेल : ट्रान्स्पोर्टची बिले काढून त्याची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता स्वतःच्या खात्यात भरून दोघा जणांनी अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्णानंद जनार्दन कोळी (वय 38) यांचा ऋषीप्रसाद ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून बीमा कॉम्प्लेक्स स्टील मार्केट कळंबोली येथे कार्यालय आहे. त्यांनी एकनाथ रामचंद्र गायकवाड यांना ट्रॅफिक मॅनेजर म्हणून कामावर ठेवले. त्यानी गायकवाड यांना ऑर्डरप्रमाणे भाडे घेऊन गाड्या ट्रान्स्पोर्टला लावण्याचे काम दिले होते. एकनाथ यांचा पुतण्या जयंत गायकवाड याला देखील कामासाठी ठेवण्यात आले. जून महिन्यात कोळी आजारी पडल्यामुळे ट्रान्स्पोर्टचे सर्व कामकाज एकनाथ गायकवाड व जयंत गायकवाड यांना समजावून सांगून कोळी आपल्या मूळ गावी कासारी, सांगली येथे गेले. ते परत आल्यानंतर त्यांना ट्रान्स्पोर्टच्या फाईलमध्ये काही बिले दिसून आले नाही. त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात एकनाथ गायकवाड व जयंत गायकवाड यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पनवेल : अज्ञात वाहनाच्या धडकेत 22 जुलैला 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पनवेल रोडवर कळंबोली फायर ब्रिगेड ब्रिच्या जवळ सुरेश हरलाल (वय 46 वर्षे) या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. या धडकेत त्याचा मृत्यू झाला असून वाहनचालक फरारी झाला आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात अपघात करून पळून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटरसायकल घसरून दोघे जखमी

पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेने पुणे दिशेला जात असताना मोटरसायकल स्लीप झाल्याने या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. राहुल रमेश नामावार (वय 20) हा घरातून एकविरा येथे जाण्याकरिता मित्र विकी विश्वकर्मा याच्यासोबत सनी पटेल याची डिओ स्कुटी क्र. (एमएच-47- एम 7036)ने निघाले होते. त्यांची दुचाकी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेने पुणे दिशेला जात असताना किमी 13/500 वर आले. त्यांची मोटरसायकल तिसर्‍या लेनवर आली त्या वेळी अचानक स्लीप झाली. यात राहुल याच्या डाव्या पायाला व पोटास मार लागला असून चालक विकी विश्वकर्मा याच्या चेहर्‍यास, ओठास, डोक्यास, डावे हातास जबर दुखापत झाली आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साथीच्या आजारांमध्ये वाढ

नवी मुंबई : दोन आठवड्यांपासून पडणारे कडक ऊन आणि दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अशा वातावरणातील तीव्र बदलामुळे नवी मुंबईत विविध आजारांची साथ पसरली आहे. विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या, तसेच खाजगी रुग्णालयांत दाखल होणार्‍या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सुमारे 300 खाटांची क्षमता असलेल्या वाशी पालिका रुग्णालयात तर खाटा रुग्णांनी व्यापल्याने जमिनीवर गाद्या अंथरून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नागरी आरोग्य केंद्रातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जुलैच्या सुरुवातीला 10 दिवस झालेल्या दमदार पावसानंतर गेले दोन आठवडे पावसाने दडी मारली होती. यादरम्यान तापमानाचा पाराही 35 अंशांवर गेला होता. त्यातच आता मंगळवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. वातावरणातील या तीव्र चढ-उतारामुळे नवी मुंबईसह आसपासच्या शहरांत विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अशा प्रकारचे तापमान विषाणू संसर्गासाठी पोषक ठरत असल्याने नवी मुंबईत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण खाजगी दवाखाने वा रुग्णालयांत जाऊन उपचार घेत असले, तरी वाढत्या रुग्णसंख्येचा ताण पालिकेची रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांवरही येऊ लागला आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply