पनवेल : बातमीदार
पनवेल शहरात गणशोत्सवानंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. दरदिवशी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील 19 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत झालेल्या गर्दीमुळे सामाजिक अंतराच्या नियमाला हारताळ फासल्याने कोरोना संसर्ग वाढल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेने पनवेलकरांना मुखपट्टी लावण्याखेरीज घराबाहेर न पडणे, सामाजिक अंतर पाळणे तसेच वेळोवेळी हात धुणे अशा त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मागील 12 दिवसांत दोन हजार 658 कोरोनाग्रस्त वाढले असून ही सर्वात मोठी वाढ असल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे. आतापर्यंत सहा महिन्यांत पनवेल पालिका क्षेत्रात 12 हजार 227 जणांना करोनाची लागण झाली आहे. आता संसर्ग वाढत असल्याने पालिकेने नागरिकांना उत्सवकाळात झालेली चूक दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.