खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील अलाना या खाद्यतेल कंपनीला रविवारी (दि. 24) दुपारी मोठी आग लागली. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अलाना कंपनी ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर हिची आहे.
पेण-खोपोली रस्त्यावर सारसन येथे असलेल्या अलाना कंपनीत रिफायनरी प्लांटला रविवारी दुपारी 1च्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त कळताच खोपोली, कर्जत नगर परिषद, उत्तम गल्वा कंपनी, एचपी कंपनी यांचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, तसेच खाजगी टँकर, पोलीस प्रशासनही आले. ही कंपनी खाद्यतेलाची असल्याने आग भडकत होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.