Breaking News

पेणमध्ये संमतीशिवाय महिलेचा गर्भपात

डॉक्टरसह सासरच्या मंडळींना अटक; पोलीस कोठडी

पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणार्‍या एका गर्भवती महिलेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टर संबंधित महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी महिलेचा यंदाच्या वर्षीच विवाह झाला होता. काही महिन्यांनी ती गरोदर राहिल्याचे सासरच्यांना कळले, मात्र या महिलेला तिच्या संमतीशिवाय पती रोशन अरुण कोळी, सासू सुभद्रा कोळी, नणंद या सर्वांनी संगनमत करून उपचार करण्यास नेतो म्हणून डॉ. शेखर धुमाळ यांचेकडे नेले. वेळोवेळी उपचाराद्वारे डॉ. धुमाळ यांनी फिर्यादीचा 16 आठवड्यांचा गर्भ नष्ट करून गर्भपात केला. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन अवयवांना गंभीर इजा झाल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी डॉ. धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नवरा लग्नानंतर मारझोड करून व उपाशी ठेवून क्रूरतेची वागणूक देत होता या तक्रारीवरून पती रोशन अरुण कोळी, सासू सुभद्रा कोळी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी दोन आरोपी नणंद देवता विनायक भोईर व नणंदेचा पती विनायक भोईर यांच्याविरोधातही दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply