Breaking News

चिपळे, शांतिवन पुलांना धोका?

पनवेल ः बातमीदार

गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे येथील चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचे स्टील खाली लोंबकळले आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेले. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू लागले होते.

जिल्हा परिषदेच्या शांतिवन पुलाच्या खालील बांधकामाचे स्टील उघडे पडले असून ते गंजू लागले आहेत. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती येथील नागरिकांना वाटत आहे. 2005 साली झालेल्या महापुरामध्ये  शांतिवन पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळेस या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. सध्या या पुलाच्या खालील सिमेंट काँक्रीट निखळत चालले असून या पुलावरून प्रवास करणार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 27 जुलै रोजी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. त्यामुळे काही ठिकाणची डांबर वाहून गेले आहे, काही काळ या पुलावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली होती, तर धोकादायक बनलेल्या चिपळे पुलाच्या लोखंडी सळ्या लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.

तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल सन 1975 साली बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे आयुष्यमान 50 वर्षे असून सद्यस्थितीत या पुलाला 43 वर्षे होऊन गेलेली आहेत. चिपळे पुलाचे डागडुजीकरणाचे 23 लाखांचे काम अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदाराने अर्धवट काम केले असल्याने लोखंडी सळ्या जैसे थे स्थितीत आहेत. पुलाची डागडुजी, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ठेकेदाराकडून या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply