Breaking News

अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये नुकसान; पंचनामे करण्यास सुरुवात

पनवेल ः बातमीदार

शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पनवेलवासीयांना बसला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती.

रविवारी पूर बाधित घरांचे पंचनामे करण्यास पनवेल तहसील विभागाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील वावंजे, कुंडेवहाळ, डोलघर, दिघाटी, बेलवली, कोळखे, केळवणे, सुकापूर आदी गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पावसाचा फटका नागरिकांसह प्राण्यांना देखील बसला आहे. नेरे, वाजे, हरिग्राम केवाळेकडे जाणार्‍या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक भयभीत झाले होते. पाण्यामुळे काहींना अडकून राहावे लागले. तलाठ्यांनी गावातील नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. रविवारी पावसाने उसंत घेतल्याने पाणी शिरलेल्या घरातील नागरिकांनी घरातील पाणी, माती बाहेर काढण्यास सुरुवात केली.

पनवेलमध्ये शनिवारी सकाळपासून अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती ओढावली होती. उमरोली गावचा संपर्क तुटला होता, तर दुसरीकडे नांदगाव पुलावरून देखील पाणी वाहून जात होते. माडभवन येथे दोन घरे कोसळली, तर काही ठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply