Breaking News

पनवेलमधील विकासकामांसंदर्भात मुंबईत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंदराज यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना बुधवारी (दि. 11) मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले.  
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीन भोये, सिडकोचे श्री. पुजारी यांसह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, आनंद ढवळे आदी उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणमार्फत देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याच्या कामांना मंजुरी मिळून बराच कालावधी होऊनसुद्धा अद्यापपर्यंत प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुनश्च मागणी करून लवकरात लवकर ही विकासकामे करा, असा आग्रह धरला.
या अनुषंगाने झालेल्या बैठकीत चर्चेनुसार देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील नवीन पूल सिडको बांधणार आहे, तर विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवर नवीन पूल सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते, मात्र या पुलाच्या खर्चात वाढ होणार असल्याने याचे काम एमएमआरडीए स्वतः करणार आहे. त्याचबरोबर पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम हाती घेण्याचे आश्वासन डॉ. गोविंदराज यांनी दिले असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
सातत्यपूर्ण पाठपुरावा
गाढी नदीच्या तीरावर देवद व विचुंबे या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. दोन्ही ग्रामपंचायती सिडको क्षेत्रास लागून असल्याने व रेल्वेस्थानकाची सुविधा नजीक उपलब्ध झाल्याने या ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले. या ग्रामपंचायतींची सध्याची लोकसंख्या सुमारे 65-70 हजारांवर आहे. या दोन्ही गावांकडे जाण्यासाठी गाढी नदीवर विचुंबे व देवद गावालगत दोन पूल असून, या पुलांव्यतिरिक्त सिडको क्षेत्रात ये-जा करण्यासाठी या गावांतील नागरिकांना दुसरा मार्ग नाही. गाढी नदीवरील विचुंबे व देवद गावाकडे जाणारे दोन्ही पूल कमकुवत झाल्याने केव्हाही दुर्घटनाग्रस्त होण्याची शक्यता असल्याने हे दोन्ही पूल नव्याने उभारण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून सातत्याने ते याचा पाठपुरावा करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply