पनवेल ः वार्ताहर
खांदा वसाहतीतील रहिवासी व नामांकित दंतचिकित्सक डॉ. संगीता देवीकर यांची ग्रीस येथे होणार्या मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यानिमित्ताने पनवेलचे नाव सातासमुद्रापार जाणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. देवीकर यांचा सराव सुरू आहे. त्यांना सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नागपूरच्या डेंटल कॉलेजच्या विद्यार्थिनी असललेल्या डॉ. संगीता यांना सुरुवातीपासून सौंदर्य क्षेत्रात आवड होती. आपला पेशा सांभाळून त्यांनी फॅशनचा छंदही जोपासला. इतकेच नाही, तर त्यामध्ये नावलैकीक सुद्धा प्राप्त केले आहे. अर्थात नवी मुंबई महापालिका रुग्णालयात मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती डॉ. राजेश देवीकर यांनी आपल्या पत्नीला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले आहे. मिसेस इंडिया वर्ड वाईड या
स्पर्धेच्या रूपाने त्यांना मोठी संधी प्राप्त झालेली आहे. पनवेल परिसरात त्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. ही स्पर्धा डॉ. संगीता देवीकर यांनी जिंकावी, असे प्रत्येकाला मनोमन वाटते. सौंदर्यक्षेत्राचा एक भाग बनण्याचे माझे स्वप्न होते. ते सत्यात उतरविण्यासाठी मी या आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत सहभाग घेतला असल्याचे डॉ संगीता सांगतात. यानिमित्ताने मी माझी लपलेली प्रतिभा दाखवून स्वप्न पूर्ण करू शकते, असेही त्यांनी सांगितले. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या
स्पर्धेच्या ऑडिशनची सुरुवात झाली. 22 हजार जणींमधून अंतिम 172 स्पर्धक निवडले गेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये आग्रा येथे निवड स्पर्धा झाली. डॉ. संगीता यांना नृत्य आणि प्रवासाची आवड आहे. त्या फिटनेसवर अधिक लक्ष देतात. क्रीडापटू, नृत्यांगना, तसेच मॉडेल व्हायलाही त्यांना आवडेल. 10 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत मिसेस इंडिया वर्ड वाईड स्पर्धा होणार आहे.
आजच्या घडीला ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून डोक्यावर सौंदर्याचा मुकुट बसावा इतकेच उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. ते साध्य करण्याची मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याकरिता पनवेलकरांच्या शुभेच्छा, पाठबळ आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की मी यामध्ये यशस्वी होऊन आपल्या शहराचा नावलौकीक वाढवेन. -डॉ. संगीता देवीकर, स्पर्धक, मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धा