पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील बोरावळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील गुडेकरकोंड आणि मोरेवाडी नळ पाणी योजनेची जॅकवेल आणि पंपघर शनिवारी सकाळी उद्ध्वस्त अवस्थेत नदीपात्रातील पूरस्थितीमध्ये दिसून आले. यामुळे मोरेवाडी गुडेकरकोंड येथे ग्रामस्थांना नळ पाणीपुरवठा होणे बंद झाले आहे.
गुडेकरकोंड व मोरेवाडी नळ पाणी योजना गेल्या सहा वर्षांपूर्वी कार्यरत झाली. शुक्रवारपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कामथी नदीला पूर आला व शनिवारी पहाटेच्या सुमारास पाणीपुरवठा योजनेची जॅकवेल व पंपहाऊस कामथी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचे दिसून आले. या घटनेनंतर स्थानिकांनी प्रशासनाला कळविले. नायब तहसीलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी, तलाठी म्हात्रे यांनी लक्ष्मण मोरे आणि नामदेव गुडेकर, दत्ताराम मोरे, तानाजी गुडेकर, दीपक जंगम, संतोष जंगम, चिमाजी पालकर, विठ्ठल गुडेकर आदी ग्रामस्थांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी गुडेकरकोंड व मोरेवाडीतील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी अधिकार्यांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले.