नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती बदलू लागल्याचं चित्र आहे. बारामुल्ला येथे नुकतीच भारतीय लष्कराने 111 जागांसाठी केलेल्या भरतीला काश्मिरी तरुणांनी याला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता स्थानिक पोलीस भरतीसाठी तरुणांनी गर्दी केल्याचं चित्र दिसलं. देशासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने अनेक तरुण या पोलीस भरतीमध्ये सहभागी झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातील विशेष पोलीस अधिकारीपदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचं पोलीस खात्याने सांगितले. गृहमंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात येणार्या या विशेष नोकर्यांत नियंत्रण रेषेपासून 0 ते 10 किमीच्या अंतरावर राहणार्यांना विशेष प्राधान्य देण्यात येते. स्थानिक तरुणांचा प्रतिसाद पाहता पुढील काही दिवस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पूंछ जिल्याचे पोलीस सहाय्यक अधीक्षक अदिल हमीद यांनी दिली. ही भरती प्रक्रिया म्हणजे आमच्यासाठीही चांगली संधी असून ही भरती प्रक्रिया राबवताना अनेक अडचणी आल्या, पण आम्ही यात यशस्वी झालो, अशी माहितीही हमीद यांनी दिली.