राज्य सरकारमार्फत नागरी सुविधा होणार उपलब्ध
नवी मुंबई : बातमीदार
आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून ऐरोली विधानसभा क्षेत्राचा सर्व समावेशक आणि समतोल विकास होत असताना नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे.
या निधीमधून ऐरोली विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण, स्कायवॉक, मार्केट अशा सुविधा उभ्या राहणार आहेत. शहरी भाग, गावठाण, झोपडपट्टी, औद्योगिक भाग, आदिवासी परिसर अशा सर्वच विभागांमध्ये सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येतो. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मागणी केल्यानुसार या अंतर्गत दहा कोटी रुपयांचा घसघशीत निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून शहराच्या आणि नागरिकांच्या गरजा ओळखून नागरी सुविधांचे निर्माण केले जाणार आहे.
दिघा विभागात एमआयडीसी आणि रहिवासी क्षेत्र मोठे आहे. या ठिकाणी मुकुंद कंपनीसमोरचा रस्ता सदैव वर्दळीचा आणि वाहतुकीचा आहे. एक कोटी रुपयांच्या निधीमधून या ठिकाणी मुकुंद कंपनीसमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक सुरळीत होणार आहे. दिघा, आनंद नगर, ईश्वर नगर आणि परिसरात राहणार्या लाखो नागरिकांना आणि एमआयडीसीमध्ये काम करण्यासाठी दररोज येणार्या हजारो कामगारांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.
राज्य सरकारकडून मंजूर करून आणलेल्या दहा कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून शहरातील नोड, गाव, गावठाण, झोपडपट्टी परिसर, औद्योगिक विभाग, आदिवासी विभाग सर्वच ठिकाणी सार्वजनिक सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. -आमदार गणेश नाईक