नागोठणे : प्रतिनिधी
रात्रीपासून पडणार्या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने मंगळवारी (दि. 30) पहाटे आपले पात्र ओलांडून शहराच्या अनेक भागात प्रवेश केला. त्यामुळे शुक्रवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंत पुराचा अनुभव घेतलेल्या नागोठणेकरांना मंगळवारी पुन्हा एकदा पुराला सामोरे जावे लागले.
नागोठणे एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मरिआई मंदिर भागात पुराचे पाणी भरले होते. नागोठणे-पेण, जुना रोहे मार्ग आणि नागोठणे-वाकण-पाली या तीनही मार्गांवर पाणी साचल्याने वाहतूक काहीअंशी विस्कळीत झाली होती. पुराचे पाणी भरल्यामुळे टपरीधारकांसह लहान-मोठ्या दुकानदारांची धावपळ झाली. रविवारी लावलेले सामान त्यांना पुन्हा एकदा उचलण्याची वेळ आली. पूरपरिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष देऊन होती.
जिल्ह्यात 2404.24 मिमी पावसाची नोंद
म्हसळा : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात 24 ते 30 जुलैपर्यंत एकूण 2404.24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या जुलैमधील पाऊस हा मागील पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत सर्वात जास्त पाऊस माथेरान 3459.60 मिमी, तर अलिबाग तालुक्यात सर्वांत कमी 1251.28 मिमी पावसाची नोंद झाली. पेणमध्ये 3254.20, मुरुड 1922, पनवेल 2579.58, उरण 1737.50, कर्जत 2409.60, खालापूर 2318, माणगाव 2742.05, रोहा 2809, तळा 3019, महाड 2025,पोलादपूर 2527, म्हसळा 2522 आणि श्रीवर्धनमध्ये 1910 मिमी पावसाची नोंद झाली.
मृग ते हस्तपर्यंत पर्जन्य नक्षत्रे म्हणून ओळखली जातात. पुष्य नक्षत्र सुरु आहे. अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा व हस्त नक्षत्रे शिल्लक आहेत. सप्टेंबरअखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडून जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान पूर्ण होईल. -महेश जोशी, पंचाग अभ्यासक