पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहू लावणारा पाऊस सलग पाचव्या दिवशीही संततधार बरसत होता. पोलादपूर शहरातून वाहणारी सावित्री सध्या विशालरूप घेऊन खळाळत आहे.
पोलादपूर तालुक्यात 24 जुलै रोजी 94 मि.मी., 25 जुलै रोजी 70 मि.मी., 26 जुलै रोजी 96 मि.मी., 27 जुलै रोजी 209 मि.मी., 28 जुलै रोजी 75 मि.मी.,29 जुलै रोजी 90 मि.मी. आणि 30 जुलै रोजी 131 मि.मी. असा पाऊस पडला असून एकूण 2527 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद तहसिल कार्यालयामधील आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली.
पोलादपूर येथील रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो झाले असून सावित्री नदीदेखील दुथडी भरून वाहू लागली आहे. तालुक्यातील माटवण येथील मोरीवरून काहीकाळ पाणी जात होते. रानबाजिरे धरणाची ’ओव्हरफ्लो’ पातळी 57.50मीटर्स एवढी असून या ’ओव्हरफ्लो’वेळी 22 हजार क्युसेक्स लिटर्स बॅकवॉटर भागात धरणामध्ये पाणी जमा असते.