Breaking News

सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

मुरुड : संजय करडे

पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसर्‍या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेली खोल दरी. हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय रहात नाही. इथला निसर्ग न्याहाळताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. 

सृष्टी निर्मात्याने कोकणाला भरभरून निसर्गसौंदर्य बहाल केले आहे. विविधतेने नटलेला निसर्ग न्याहाळताना, डोळ्यात साठवताना डोळ्याचे पारणे फिटते. पावसाळ्यात तर हे निसर्गसौंदर्य आणखीनच खुलते. हिरवागार शालू पांघरलेले डोंगर, त्यातून अवखळपणे वाहणारे झरे, नागमोडी वळणे यामुळे निसर्गाचे सौंदर्य खुलते. रिमझिम पावसात पसरलेल्या दाट धुक्यात हरविलेले घाटातील रस्ते, खोल दरीतून हळुहळू वर येणारी दाट धुक्क्याची चादर न्याहाळताना मिळणारे नेत्रसुख अनोखे आहे. निसर्गाची ही जादूई दुनिया पाहण्यासाठी पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते.

मुरुड तालुक्यातील सवतकडा धबधब्यावर जाताना रस्त्याच्या उजव्या बाजुला असलेल्या डोंगरातून खळखळ करत वाहणार्‍या दुधाळ धबधब्यांची रांग आपले लक्ष वेधून घेते. प्रत्येक धबधबा आपल्याला मोहीत करत असतो. दाट धुक्यामुळे दरीत डोकावून पाहिले तर काहीही दृष्टीस पडत नाही मात्र दरीतील धुके जेव्हा वर येऊ लागते तेव्हा निसर्गाची चंदेरी चादर कुणीतरी वर घेऊन येत असल्याचा भास होतो. रस्त्यावरुन चालताना धबधब्यांच्या पाण्याचे अंगावर उडणारे तुषार रोमांचीत करतात. खळखळून वाहणारे हे दुधाळ धबधबे पाहिले की, त्याच्याखाली बसून चिंब भिजण्याचा मोह आवरता येत नाही. सवतकडा धबधब्याकडे जाण्यार्‍या रस्तावर वावडुंगी ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावल्यास पर्यटकांना धबधब्यावर पोचण्याकरिता त्रास होणार नाही. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल व स्थानिकांना रोजगार

मिळू शकेल.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply