Breaking News

भारतीय रेल्वे अजिंक्य

पं. दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा

हिसार : वृत्तसंस्था

हरियाणातील हिसार येथे झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय रेल्वेने सेनादलाला 31-27 असे पराभूत करीत विजेतेपदाचा चषक व रोख एक कोटी रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या सेनादलाला चषक व रोख 50 लाख रुपये मिळाले. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील रोह्यात जानेवारीच्या अखेरीस झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेनंतर पुन्हा एकदा सेनादलाला रेल्वेकडून पराभव पत्करावा लागला.

रेल्वेने सुरुवातच आक्रमक करीत सेनादलावर पहिला लोण देत आघाडी घेतली. मध्यांतराला 19-11 अशी आघाडी रेल्वेकडे होती. पवनकुमार, विकास खंडोला यांच्या धारदार चढाया धर्मराज चेल्वनाथन, रविंदर पहेल यांचे भक्कम क्षेत्ररक्षण यामुळे रेल्वेने हा विजय साजरा केला. मध्यांतरानंतर सेनादलाच्या रोहितकुमार, मोनू गोयत यांना सूर सापडला. काही झटापटीचे क्षणदेखील पहावयास मिळाले, पण अशा वेळी रेल्वेचे प्रशिक्षक संजीवकुमार व राणा तिवारी यांनी खेळाडूंना काही कानमंत्र देत हा विजय साजरा केला.

पं. दीनदयाळ उपाध्याय स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष. राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या आठ संघांना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला होता; तर काही नामवंत व्यावसायिक संघांनादेखील या स्पर्धेकरिता निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रातून एअर इंडियाला या स्पर्धेचे निमंत्रण होते. गतवर्षी एअर इंडियाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. महाराष्ट्रानेही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गतवर्षी महाराष्ट्राने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. यंदा राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला अमीर धुमाळ वगळता इतर सर्व नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली होती, मात्र त्यांना एकही विजय मिळविता आला नाही. साखळीत त्यांना रेल्वेकडून; तर उपांत्यपूर्व फेरीत सेनादलाकडून पराभव पत्करावा लागला.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply