Breaking News

चिकुनगुनिया

चिकुनगुनिया हा आजार नावाने परिचित झाला असला तरी डेंग्यूप्रमाणे त्याच्या अस्तित्वाने खळबळ उडताना दिसते. या आजारात सांध्यांचे दुखणे हे प्रमुख लक्षण असले तरी हे दुखणे प्रामुख्याने बराच काळ राहते. या आजारात व्यक्ती ताप, सांधेदुखी, सांध्यांना आलेली सूज यामुळे हैराण होतोच, शिवाय औषधांचे सेवन करूनही वैतागतो. या आजारात कमालीचा अशक्तपणा येतो. या अवस्थेत योग्य आहार घेतल्यास आजारावर मात करणे सहज शक्य आहे.

 चिकुनगुनियाच्या पहिल्या अवस्थेत ताप कमी झाल्यानंतर गायीचे तूप, लोणी, दुधाचे सेवन केल्यास अशक्तपणा कमी होऊन सांध्यांत जोर येतो. काही रुग्णांना कोरडा खोकला होतो. अशा रुग्णांनी शेळीचे दूध, तूप सेवन केल्याने चांगला आराम मिळतो. चिकुनगुनियाच्या इतर अवस्थेत काळीमिरी घालून पनीरचे सेवन करावे. चीझचाही आहारात अल्प प्रमाणात वापर करावयास हरकत नाही. सांधे जखडले असता गर्भवती किंवा अशक्त स्त्रियांनी खव्याचे पदार्थ खाल्ल्यास फायदा होतो. चिकुनगुनियाच्या पहिल्या ज्वर आणि त्वचेवर पुरळ येण्याच्या अवस्थेत हळदीचे सेवन उत्तम ठरते. हळदीचा वापर केवळ पाण्यातूनही केल्यास उपयुक्त ठरते. हळद व आल्याचे एकत्रित मिश्रण भूक वाढवून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. लहान मुलांना ओल्या हळदीचे दुधातून चाटण दिल्यासही गुण येतो.

चिकुनगुनियाची सुरुवात झालेली असताना गुळवेलीच्या पानांची भाजी वा सूप अत्यंत फायदेशीर असते. गुळवेलीची पाने चवीने कडू असली तरी गुणाने अत्यंत गोड असतात. सुरुवातीला तोंडली, तांदुळजा, पडवळ, चाकवत, कारलीचे यथेच्छ सेवन करावे. चिकुनगुनियाच्या पहिल्या अवस्थेत पालक खाल्ल्यास फायदा होतो, मात्र पुढील अवस्थेत पालकचे सेवन केल्यास त्रास वाढताना दिसतो. चिकुनगुनियात सांधे जखडले असता दुधी भोपळा, भेंडी, कोवळी वांगी गुणकारी ठरतात. सांध्यांसह मांसपेशी जखडल्या असता शेवग्याचे सेवन केल्याने आराम पडतो. भाज्या करताना मात्र शेंगदाण्याचा वापर शक्यतो टाळावा. त्याऐवजी खोबरे, तिळाचे कूट याचा वापर करावा. चिकुनगुनियाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जुन्या तांदळाचा तसेच जुन्या सातूचा आजार वाढू न देण्यासाठी चांगला फायदा होतो.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply