बिल वेळेवर भरतो मग सेवा का नाही; व्यापारी वर्गाचा संतापजनक सवाल
महाड : प्रतिनिधी
तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या सेवेचा गेल्या वर्षभरापासून बोजवारा उडाला असून, या खंडित सेवेमुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत ऐकून घेण्यास स्थानिक पातळीवर अधिकारीदेखील नसल्याने ही सेवा म्हणजे वार्यावरची वरात झाली आहे. याबाबत महाड व्यापारी असोसिएशनने मंगळवारी (दि. 30) शहरातील बीएसएनएल कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला.
महाड हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा तालुका आहे. किल्ले रायगड, शिवथरघळ, महाड चवदार तळे, गांधारपाले लेणी आदी स्थळांवर प्रतिवर्षी लाखो पर्यटक, शिवभक्त, भीमसैनिक दाखल होत असतात. या लोकांनादेखील बीएसएनएलच्या खंडित सेवेचा फटका बसत असतो. महाड शहर आणि तालुक्यात काही ठिकाणी आजही बीएसएनएलचे दूरध्वनी आहेत. शासकीय पातळीवरदेखील याच सेवेचा वापर केला जात आहे. बँका, महसूल कार्यालयात बीएसएनएलचेच दूरध्वनी आणि इंटरनेट वापरला जातो. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारही याच सेवेचा लाभ घेत आहेत, मात्र गेल्या वर्षभरापासून तालुक्यात या सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्याचा स्थानिक पातळीवरील शासकीय, बँकिंग, तसेच व्यापारी वर्गाच्या कामावर परिणाम होत आहे, मात्र त्याबाबत स्थानिक पातळीवर कोणीच दखल घेत नसल्याने मुकाटपणे बिल भरणे याला पर्याय उरलेला नाही. बिल भरूनदेखील अवस्था बिकट असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
किल्ले रायगडवरदेखील बीएसएनएलचा टॉवर आहे, मात्र तो गेली काही वर्षे कधी सुरू तर कधी बंद अशा अवस्थेत आहे. यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना संपर्क साधणे कठीण होऊन बसत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या, मात्र आजतागायत दखल घेण्यात आलेली नाही. महाड आणि पोलादपूर तालुक्यात जवळपास 27 मोबाईल टॉवर आहेत. ते सर्व ग्रामीण भागात आहेत. शहरात फक्त चार टॉवर उभे आहेत. असे असूनदेखील या ठिकाणी मोबाईलला रेंज न मिळणे, इंटरनेट न मिळणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील बहुतांश व्यापारी आजही दूरध्वनी वापरत आहेत. त्यांचा संपूर्ण व्यापार या दूरध्वनीवर अवलंबून आहे. आज अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने केली जातात. अशा वेळी या सेवेचा लाभ घेता येत नाही. प्रतीमहिना बिल मात्र वेळेत भरणे हे ग्राहकाला जबरदस्तीचे असते, मात्र खंडित सेवा सुधारण्यास बीएसएनएल बांधील नसल्याचे दिसून येत आहे.
महाड शहर व्यापारी असोसिएशनने मंगळवारी थेट बीएसएनएल कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला. या वेळी मंडळ अधिकारी सतीश कोल्हे यांनी वरिष्ठांना कळवून बैठक लावण्याची विनंती केली. व्यापारी असोसिएशनचे मुंदडा, सुहास तलाठी, प्रकाश मेहता, गावडे आदी व्यापारी उपस्थित होते.