आपले आपण घरी शिजवून खाणे हा अधिक उत्तम पर्याय नव्हे का? किंवा किमानपक्षी थोडी पायपीट करून शुद्ध शाकाहारी हॉटेलापर्यंत तरी जावे. आपला आग्रह जगासमोर ‘अतिरेकी दुराग्रहा’च्या रूपात मांडण्याचा खटाटोप कशासाठी? केवढेसे ते क्षणभंगुर मानवी जीवन, विश्वाच्या या अवघ्या पसार्यात आपले अस्तित्व केवढे ठिपक्याएवढे असे सांगणारा आपली महान धर्मसंस्कृती. आपल्या आध्यात्मिक संचिताचे खरोखरीचे मनन, चिंतन केल्यास अशी अप्रगल्भता निश्चितच बोकाळणार नाही.
झोमॅटो या हॉटेलमधील पदार्थ घरोघरी पोहोचवणार्या अॅप सेवेच्या एका ग्राहकाने काल नोंदवलेल्या आगळ्या मागणीमुळे पुन्हा ट्विटर या समाजमाध्यमावर एका नव्या वादाला तोंड फुटले. ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवल्यावर ते पोहोचवणारा मुलगा मुस्लिम आहे असे कळल्यावर जबलपूर येथील अमित शुक्ला नामक ग्राहकाने ती ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. आपली ऑर्डर हिंदू डिलिव्हरी बॉय मार्फत पाठवावी अशी त्याची मागणी होती. त्यावर कंपनीने असा भेदभाव करता येणार नाही, असा पवित्रा घेतला. त्या ग्राहकाने त्यावर आपल्या ऑर्डरची रक्कम परत केली नाही तरी चालेल परंतु ऑर्डर रद्द करा अशी भूमिका घेतली. कंपनीने अन्नाला धर्म नसतो असे विधान करीत भारतातील विविधतेचा आपल्याला अभिमान आहे असे म्हटले व त्या ग्राहकाची ऑर्डर रद्द केली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी समर्थकांची ट्विटरबाजी जोरात सुरू झाली. दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. श्रावणामुळे आपल्याला मुस्लिम तरुणाने पोहोचवलेले अन्न खाता येणार नाही असे त्या ग्राहकाचे मत होते. त्याच्या या भावनेचा आदर झोमॅटोने ठेवला पाहिजे असे शुक्ला याच्या समर्थकांचे म्हणणे होते. त्यांच्या मते, जर झोमॅटो ग्राहकांची हलालच मांस हवे अशी मागणी विनयाने मान्य करते आणि तशी सेवा देऊ करते तर मग कुणाला श्रावणात हिंदूकडूनच डिलिव्हरी हवी असल्यास ती का नाही? यावर झोमॅटोचे म्हणणे असे आहे की तुम्ही विशिष्ट ‘अन्नपदार्थां’बाबत मागणी करा आम्ही ती पुरवण्याचा प्रयत्न कसोशीने करू. परंतु डिलिव्हरीच्या इसमाच्या जातिधर्माच्या बाबतीतल्या मागण्या पुरवता येणार नाहीत. खरे तर हे एका परीने बरोबरच आहे कारण अशा मागण्या वाढत जाऊन मग आपल्याला अमुक जातीच्या इसमाकडून डिलिव्हरी नको येथपर्यंत हा आग्रह जाऊ शकतो. वास्तवत:, अन्नपदार्थ घरपोच देणार्या इसमाचे नाव आणि त्यावरून धर्म कळतो, परंतु तो पदार्थ कुणी बनवला आहे, हे कुठे कुणाला कळते? हॉटेलमध्ये जाऊन खाणारे कधी तरी अशी चौकशी करतात का? अर्थात, निव्वळ ‘शुद्ध शाकाहारी’ अशी पाटी बघून काटेकोरपणे शाकाहार करणारे जात असतीलही. पण ते शाकाहारी अन्न तयार करण्यासाठी राबणारे हात शाकाहारीच असतात याची हमी खरेच असते? होणार्या कच्च्यामालाचा अवघा पुरवठा हिंदू आणि शाकाहारी व्यक्तींकडूनच होतो याची खातरजमा करता येते? भाज्या पिकवणारे सर्व हिंदूच होते का? तेल व मसाले बनवणारे सारे हिंदूच होते का? हा माल पुरवणार्या गाड्यांचे चालक सर्व हिंदूच होते का? असे प्रश्न कुणाला कधी पडतात का? अर्थात, अंतिम अन्नपदार्थाच्या बाबतीत तसा एखाद्याचा आग्रह प्रामाणिकही असू शकतो हेही पटण्यासारखे आहे.