Breaking News

अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्त्वपूर्ण

कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन

कर्जत : रामप्रहर वृत्त

जगात भात लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र भारतामध्ये (4.39 दशलक्ष हेक्टर) असून उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात भाताचा वाटा 40 टक्के पेक्षा अधिक असल्याने अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी येथे केले. कर्जत येथील प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात आयोजित केलेल्या दर्जेदार भात पैदास विषयावरील बौद्धिक विचारमंथन कार्यक्रमात कुलगुरू डॉ. सावंत बोलत होते. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी जैव व आण्विक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार अन्नधान्य निर्मितीवर शास्रज्ञांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोकण कृषि विद्यापीठाने भाताच्या 34 जाती विकसित केल्या आहेत. प्रक्रियेसाठी वापरल्या जातील, अशा भाताच्या जाती विकसित करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी यावेळी व्यक्त केले.संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी परीमाणापेक्षा गुणवत्ता महत्वाची असून आण्विक तंत्रज्ञानाचा वापर भात दर्जा सुधारण्यासाठी व्हायला हवा, असे सांगितले. भुवनेश्वर (ओरिसा) येथील कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील मानद प्रा. डॉ. सत्यरंजन दास यांनी ’दर्जेदार भातासाठी सुगंधी आणि आखूड भात वाण पैदास’, हैद्राबाद येथील भात संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेशु माधव यांनी ’भात दर्जा सुधारण्यासाठी जैवतंत्रज्ञान पध्दती’, रोहा येथील काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्थेचे डॉ. एस. बी. स्वामी यांनी दर्जेदार भातासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान’ व शिरगावच्या कृषि संशोधन केंद्राचे डॉ. भरत वाघमोडे यांनी कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भात जातींच्या संशोधनाबाबतचे सादरीकरण केले. प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रमेश कुणकेरकर यांनी प्रास्ताविकात मागील शंभर वर्षात  केंद्राने केलेली वाटचाल व योगदानाचा आढावा घेत जैवतंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन देणार्‍या भात जाती विकसित करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल दहिफळे यांनी केले. या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण शास्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते, डॉ. एस. बी. भगत यांनी आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply