नागोठणे : येथील मुंबई-गोवा महामार्गाच्या 15 फूट खोली असणार्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 1) हाती घेण्यात आले होते. पाऊसपाण्याची तमा न बाळगता सलग आठ तास चाललेल्या या कामात जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामगारांबरोबर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे अनुभवी प्लंम्बर चंद्रकांत ताडकर यांनी या कामात मोलाचे सहकार्य केले होते. या कामाची दखल घेत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ताडकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर प्रकाश कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
चंपावती पतसंस्थेची वार्षिक सभा
रेवदंडा : येथील चंपावती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 11) दुपारी 3.30 वाजता रेवदंड्यामधील स. रा. तेडूलकर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सभेत आर्थिक अहवाल वाचन, नफा वाटणी प्रस्तावास मंजुरी देणे, लेखा परिक्षक, अंतर्गत हिशोब तपासणीस व टॅक्स ऑडिटर्सची नियुक्ती करणे, अंदाजपत्रक आणि कर्ज निलेखनाला मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, असे संस्थेचे सचिव उल्हास तुरकर यांनी कळविले आहे.
उल्हास गुंजाळ यांची अध्यक्षपदी निवड
मुरूड : येथील सोमवंशी क्षत्रिय माळी समाजाची वार्षिक सभा समाज अध्यक्ष प्रमोद दत्तात्रय भायदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत 2019 ते 2022 या कालावधीसाठी पदाधिकार्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात उल्हास गुंजाळ (अध्यक्ष), महेश कारभारी (उपाध्यक्ष), केतन वर्तक (सचिव), राकेश मसाल (सहसचिव) यांचा समावेश आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष उल्हास गुंजाळ यांनी या वेळी सांगितले.
जन्नत कलेक्शन शॉपीचे उद्घाटन
पेण : शहरातील खानमोहल्ला येथील जन्नत कलेक्शन या लहान मुलांच्या कपड्यांच्या शॉपीचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शहेनाज मुजावर, भाजप शहर उपाध्यक्ष अजय क्षिरसागर, लियाकत मुजावर, अनवर खान, मुजम्मील मुजावर, अर्शद कच्छी, हरून कच्छी, ताबीश कच्छी, सनोबर कच्छी आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी नोकरी बरोबरच तरूणवर्ग व्यवसायात पाऊल ठेवत असून यामध्ये यांची प्रगती व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या.
पोलादपुरात रेखाकला परीक्षा मार्गदर्शन
पोलादपूर : सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष विनायक चित्रे यांच्या संकल्पनेतून गेली दहा वर्ष पोलादपूर तालुक्यातील ज्या विद्यालयात कलाशिक्षक नाहीत अशा विद्यालयातील विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला श्रेणी परीक्षेच्या विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येते. या वेळी साखर येथील माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेच्या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन सहयोगचे विश्वस्त विजय दरेकर, सदस्य सुभाष ढाणे, कलामार्गदर्शक संतोष सुतार व मुख्याध्यापक करंजकर याच्या उपस्थितीत करण्यात आले. विजय दरेकर व संतोष सुतार यांनी या वेळी शासकिय रेखाकला परीक्षेचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन वर्गाचा लाभ माध्यमिक विद्यालय-साखर,तानाजी शेलारमामा प्रशाला-उमरठ, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय-देवळे येथील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्यासाहेब जाधव यांनी केले. या प्रशिक्षण वर्गानिमित्त सुभाष ढाणे यांनी आभार मानले.