मुंबई : प्रतिनिधी
प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अखेरीस दबंग दिल्लीचा विजयरथाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने रोखला आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 31-26च्या फरकाने बाजी मारली. रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीने आपल्या पराभवाचे अंतर सात गुणांपेक्षा कमी ठेवल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला. या एका गुणामुळे दिल्ली आपले पहिले स्थान कायम राखून आहे.
पहिल्याच सत्रात गुजरातच्या खेळाडूंनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. गुरुनाथ मोरे, रोहित गुलिया आणि सचिन यांनी चढाईमध्ये महत्त्वाच्या गुणांची कमाई करीत संघाला आघाडी मिळवून दिली. रवींद्र पेहल आणि जोगिंदर नरवाल या दिल्लीच्या जोडगोळीला गुजरातच्या त्रिकुटाने पहिल्या काही मिनिटांमध्ये चांगलेच सतावले, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या संघाकडून नवीन कुमार आणि चंद्रन रणजीत यांनी डाव पलटवला.
गुजरातच्या फॉर्मात नसलेल्या बचावफळीचा फायदा घेत दिल्लीच्या दोन्ही खेळाडूंनी झटपट गुण मिळवण्यास सुरुवात केली. दिल्लीच्या या आक्रमणासमोर गुजराचा संघ काहीसा बॅटफूटवर गेला. त्याला नवीन कुमारने पहिल्या सत्रात चढाईमध्ये पाच गुणांची कमाई करीत दिल्लीला आघाडी मिळवून दिली. चंद्रन रणजीतने तीन गुण मिळवत चांगली साथ दिली. गुजरातची बचावफळी पहिल्या सत्रात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकली नाही. या जोरावर दबंग दिल्लीने 14-12 अशी दोन गुणांची निसटती आघाडी घेतली.
दुसर्या सत्रात गुजरातने चांगले पुनरागमन केले. दिल्लीच्या बचावफळीने केलेल्या चुकांचा फायदा घेत गुजरातच्या चढाईपटूंनी सामन्यात 16-16 अशी बरोबरी साधली. दुसर्या सत्रात गुजरातने दिल्लीच्या बचावफळीला लक्ष्य केले होते, ज्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले. सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना गुजरातच्या संघाकडे 26-22 अशी आघाडी होती. यानंतर गुजरातने सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. अखेरीस 31-26च्या फरकाने गुजरातने सामन्यात बाजी मारली.