Breaking News

सेवाव्रती नेतृत्व

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाची दुहेरी जबाबदारी दिली त्या वेळी रायगड जिल्ह्यात पक्षाची ताकद फक्त तालुक्यातील शहरी विभाग वगळता इतरत्र नगण्य होती. अशा प्रसंगी काही काळ स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील पोलादपूर ते म्हसळा या टोकापर्यंतच्या तालुक्यात सातत्याने अहोरात्र दौरे करून तालुक्यातील नागरिकांबरोबर विभागवार सुसंवाद साधून पक्षबांधणीसाठी काम करणारे, कार्यकर्ते हेरून ठिकठिकाणी तालुकावार पक्षसंघटनेची ताकद वाढीसाठी मेहनत घेऊन प्रसंगी खर्चाची तमा न बाळगता जिल्ह्यात पक्षसंघटना मजबूत करून ती वाढविण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात उत्तम प्रकारे पक्ष नावारूपाला येत असतानाच नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांना त्यांची योग्य साथ मिळाल्याने बघता बघता जिल्ह्यात प्रत्येक तालुकावार भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेशासाठी चढाओढ होऊन झपाट्याने पक्षाची स्थिती भक्कम केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रामाणिक, निःस्वार्थी, अथांग मेहनतीचे गमक ओळखून राज्याच्या नेतृत्वाने त्यांच्यावर सिडको अध्यक्षाची तिहेरी जबाबदारी दिली. ती समर्थ सांभाळण्याचे काम आजही ते करीत आहेत.

पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची सलग 50 वर्षे सत्ता होती. त्या वेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शासनाकडून विकासकामांसाठी मिळणार्‍या निधीतून ग्रामीण भागात विविध प्रकारे विकासकामे केली जात होती. ती सर्व विकासकामे फक्त शेकापच करू शकतो, अशी भाबडी भावना जनतेत होती. त्यामुळे शेकाप पुढार्‍यांचा ग्रामीण विभागात मोठा वचक होता. अशा कठीण प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दानशूर लोकप्रियतेमुळे प्रशांत ठाकूर हे पनवेल तालुक्याचे आमदार निवडून आल्यावर त्यांनी प्रथम ग्रामीण विभागातील विविध प्रकारच्या गाववार संघटना, महिला मंडळे, बचत गट, सामाजिक संस्था, विविध पक्षांचे प्रमुख होतकरू कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक संघटना, मित्रमंडळ यांच्याशी चर्चा करून प्रत्येक वाड्या, वस्ती पिंजून काढून त्या गावांत अग्रक्रमाने कोणती कामे करणे गरजेची आहेत याचे सर्वेक्षण केले. त्यानंतर विशेषकरून रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, प्राथमिक शाळांची स्थिती, स्मशानभूमी या मूलभूत सार्वजनिक कामांना प्रथम प्राधान्य देऊन मागील 50 वर्षांत न झालेली कामे आमदार निधी व आवश्यकतेनुसार मोठ्या कामासाठी शासनाचा निधी उपलब्ध करून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामे करून अल्पावधीत जनतेचा विश्वास संपादन केला.

विकासकामे करताना ज्या ग्रामपंचायत हद्दीत कामे मंजूर केली जात होती, त्या ग्रामपंचायतींकडून आमदार निधीमधून काम मंजुरीसाठी ग्रामपंचायतींचा ठराव मंजूर करून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवणे गरजेचे असते, मात्र ज्या ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती, त्या ग्रामपंचायतींचा ठराव मंजूर करण्यासाठी ते अडचणी निर्माण करीत होते. आमदार निधीतून मंजूर केलेल्या कामांना अडथळे येऊ नयेत म्हणून ती कामे जिल्हा परिषदेकडून न करता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घ्यावी लागत होती. परिणामी विरोधकांना कामात अडचणी आणता येणार नाहीत अशी व्यवस्था आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून तालुक्याच्या विकासकामांवर जोमाने भर दिला आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय मदत, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, धर्मादाय आयुक्त, अलिबाग यांच्या कार्यालयाकडून महिला मंडळ व सामाजिक संस्था नोंदणी करून देणे, बचत गट, वीज मंडळाच्या समस्या, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी गरजूंना सहाय्य, संजय गांधी निराधार योजनेमधून गरजू लाभार्थींना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक समस्या, ग्रामीण भागातील रस्ते, घरपट्टी लावणेसंबंधी तक्रारीचे निराकरण, घर बांधणीसंबंधी तक्रारी, अतिक्रमणे इत्यादी समस्यांचे निराकरण करून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात जिल्हा परिषद व महसूल विभागात काम केलेले अनुभवी सेवानिवृत्त अधिकारी नियुक्त करून पनवेल तालुका व रायगड जिल्ह्यातील जनतेची दैनंदिन कामे सुलभतेने होण्यासाठी सहाय्य करण्याचे काम करण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही आमदार, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केली नसावी असे वाटते. ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराबाबत नागरिकांकडून सतत तक्रारी येत असतात. त्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून निराकरण केले जाते. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार संबंधित ग्रामपंचायतीमधून केलेल्या कामांचे कागदपत्र मागवून लाखो, कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले आहेत. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करून वेळोवेळी विधानसभेत पोटतिडकीने अभ्यासू प्रश्न मांडून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून संबंधितांवर फौजदारी गुन्हे व कोर्ट केसेस दाखल करून घेतल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायतींवर अंकुश ठेवून त्यांना लगाम घालण्याचे काम हाती घेऊन व भ्रष्टाचार्‍यांवर वचक ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उक्तीप्रमाणे ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशा प्रकारे संदेश देत सर्वसामान्य जनमानसात स्वच्छ प्रतिमा ठेवण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडवून भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व राजकीय कार्यकर्ते यांच्यावर वचक ठेवणारे शालिवान, विनम्र, संयमी, अभ्यासू आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पावधीत पनवेल तालुक्याचा कायापालट करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एक, सर्वसामान्य जनमानसात समरस होणारे विनम्र व्यक्ती म्हणून रायगड जिल्ह्यातील जनता त्यांना प्रशांतदादा या नावाने ओळखते.

-के. जी. म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर मुख्य जनसंपर्क कार्यालय, पनवेल

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply