रोह्यात पूरजन्य परिस्थिती कायम
रोहे : प्रतिनिधी
रोहा अष्टमी शहरासह तालुक्यातील पूरजन्य परिस्थिती कायम आहे. पावसाचे थैमान सुरूच असून रोह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस चालूच आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात पाणी असून कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरील पाणी अद्याप ओसरले नसून हा पूल 48 तास पाण्याखाली आहे. त्यामुळे रोहा-नागोठणे, रोहा-अलिबाग हा मार्ग बंद आहे. दुसरीकडे रविवारी (दि. 4) रोहा-रेवदंडा मार्ग बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. अष्टमी नाका व अष्टमी कोळीवाडा या भागात गेले 48 तास झाले पाणी शिरले असून ते अद्याप ओसरत नाही, त्यामुळे येथील नागरिकांचे हाल झाले आहेत. घरातील काही सामानाचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे रोहा तालुक्यातील रोहा कोलाड मार्गावरील रोठखुर्द या गावालाही पुराचा फटका बसला आहे. भुवनेश्वरमधील काही भागात पाणी शिरले होते. कुंडलिका नदीच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला असून गावातील नागरिक भयभीत झाले आहेत, तर रोहा तालुक्यातील मेढा, चणेरा, भातसई, सानेगाव, धाटाव, पिंगळसई, देवकान्हेसह तालुक्यातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आहे.
खालापूर तालुक्यात पावसाचे थैमान
खालापूर ः प्रतिनिधी
खालापुरात दोन दिवस पावसाने थैमान घातले असून नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. पाताळगंगा नदीला पूर आल्याने खालापुरातील कैरे व लोधीवली गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. लोधीवली वाडीकडे जाणारा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, नवी मुंबईस पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरण जलसाठा पूर्ण क्षमतेपेक्षा वाढल्याने रविवारी (दि. 4) पहाटे 2:25 मिनिटांनी या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातील पाणी सोडल्याने चौक गावासह नदीपात्राशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणातून रात्री पाणी सोडण्यात आल्याने धावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे. मोरबे धरणाची पूर्ण संचयपातळी 88 मी. जलसाठा 180.905 दशलक्ष लिटर घनमीटर आहे. हा जलसाठा पूर्ण झाल्याने रात्री पाणी सोडण्यात आले. पाताळगंगा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी रसायनीत शिरले आहे, तर रसायनी पोलीस स्टेशन पाण्याखाली गेले आहे.
कर्जत येथे रेल्वेची सिग्नल यंत्रणा ब्लॅक आऊटफ
कर्जत ः बातमीदार
शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेने रविवारी (दि. 4) काही भागात दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला आहे, पण कल्याण-कर्जत भागात असा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नव्हता, मात्र सिग्नल यंत्रणाही बंद करून ठेवण्यात आली होती आणि सिग्नलचे खांब ब्लॅक आऊट झालेले दिसत होते. शनिवारीदेखील कर्जत लोकल तासभर उशिरा धावत होत्या आणि त्या कल्याण, तर कधी ठाणे नावाने पुढे सरकत होत्या. शनिवारी रात्री तर पावसाचा प्रचंड जोर यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. आज सकाळी उपनगरीय लोकलची सेवा बंद असल्याची उद्घोषणा होत होती. त्याच वेळी सकाळपासून मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा देखील बंद ठेवण्यात आली होती. आणिबाणीच्या काळात सिग्नल यंत्रणा पूर्णपणे ब्लॅक आऊट केली जाते, त्याप्रमाणे सिग्नलच्या खांबावर लाल, पिवळे, हिरवे असे कोणत्याही रंगाचे दिवे पेटलेले दिसत नव्हते. त्यामुळे अशी परिस्थिती पाहून मुंबईच्या लोकलची प्रतीक्षा करणारे असंख्य पर्यटक हे कर्जत, नेरळ स्थानकात खूप वेळ बसून होते.