Breaking News

राज्यात पावसाचे धुमशान

अनेक भागांत पूरस्थिती, धरणांतून पाण्याचा विसर्ग, जनजीवन विस्कळीत

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 4) दाणादाण उडाली. पालघर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, खडवली, कल्याण, रत्नागिरीतील खेड, विदर्भात गडचिरोली, नाशिक आदी भागांत नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. पालघर, खडवलीत तर अनेक जण पुरात अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. खडवलीतील 20 जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे मुंबईसह कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील लोकांना आजही सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. रात्रीपासूनच पावसाने आणखी जोर धरल्याने आजही बदलापूरहून मुंबईला जाणार्‍या लोकल ठप्प होत्या. शीव ते कुर्ला स्थानकादरम्यान रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवा कोलमडून गेली होती. चुनाभट्टी आणि टिळक नगर दरम्यान पाणी साचल्याने हार्बरही ठप्प होती. सुदैवाने रविवार सुटीचा दिवस असल्याने प्रवाशांचे हाल झाले नाहीत. बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगरमध्येही घराघरांत पाणी शिरल्याने येथील रहिवाशांंना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. त्यातच बारवी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने येथील रहिवाशांंमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. खडवली येथे अडकलेल्यांपैकी सुमारे 20 नागरिकांना एअरलिफ्ट करून त्यांना ठाण्यातील कोलशेत एअरबेस येथे सुखरूप आणण्यात आले आहे. आणखी काही अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हॅलिकॉप्टर पुन्हा रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईतील मिठागर परिसरात सुमारे 400 कुटुंब अडकल्याचे वृत्त आहे. या कुटुंबांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून अनेकांचे वाचवण्याच एनडीआरएफच्या टीमना यश आले. नाशिककडे जाण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने, मुंबईचा नाशिक मार्गाशी संपर्क तुटला होता. कसारा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाने कहर केला असून गोदावरी नदीलाही पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुण्यातही मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पौड-मुळशी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुणे-मानगाव महामार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे येथील प्रवाशांचे हाल होत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठी राज्य सरकार सज्ज -मुख्यमंत्री

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. जोरदार होत असलेल्या अतिवृष्टीमुळे लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे मुंबई आणि उपनगरांमधल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. मदतकार्यासाठी जिल्हा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुरात अडकलेल्या खांडवली नजीकच्या नांदखुरी येथील सुमारे 35 ग्रामस्थांची हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी, अशी विनंती भारतीय हवाई दलाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाडमध्ये कहर; सहा गावांचा संपर्क तुटला

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यात गेला आठवडाभर मुसळधार पावसाची संततधार सुरूच राहिल्याने रविवारी (दि. 4) सलग पाचव्या दिवशी देखील महाडमध्ये विविध भागांत शिरलेले पाणी कायम राहिले आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील विविध गावांत घरे कोसळून वित्तहानी झाली आहे तर दुर्गम भागातील सावरट गावाकडे जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने जवळपास सहा गावांचा संपर्क तुटला आहे. महाड तालुक्यात कोसळणारा मुसळधार पाऊस काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून सातत्याने सावित्री नदीच्या पुराचे पाणी शहरात शिरत असल्याने गेल्या चार दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले पाच दिवस महाडमधील दस्तुरी नाका, गांधारी हा परिसर पाण्याखाली गेला आहे. ओहोटी नंतर काही काळ गांधारी पूल, दादली पूल आणि महाड रायगड मार्ग, म्हाप्रळ-पंढरपूर हे मार्ग खुले होत असले, तरी पाऊस सुरू होताच जैसे थे स्थिती निर्माण होत आहे. यामुळे गेले चार दिवस महाड बाजारपेठ बंद राहिली आहे. महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शेजारील भात शेतीत कायम राहिले आहे. यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply