पनवेल : प्रतिनिधी
पनवेल आगारातील प्रत्येक चालक आणि वाहकाला ड्युटीवर असताना गाडी बदलताना आपले सामान स्वत:सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पनवेलच्या वरिष्ठ आगारप्रमुख वानखेडे यांनी ही माहिती दिली. कर्जत-आपटा या वस्तीच्या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिरेकी हे रेल्वे किंवा सार्वजनिक प्रवासी वाहनांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील आपटा येथे एसटी बसमध्ये आढळलेला बॉम्ब हा अलिबाग ते कर्जत प्रवासात ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्जत येथे गाडी बदलताना चालकाने वाहकाची पिशवी समजून ती दुसर्या गाडीत आणून ठेवल्यानंतर या पिशवीत आपटा येथे बॉम्ब आढळला होता. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल आगारातील चालक आणि वाहकांना आपली गाडी बदलताना आपले सामान स्वत:च घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.