Breaking News

दुर्दैवी युती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्तांतरानंतर गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेला गळतीच लागलेली पहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी केलेली संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा शिवसेनेचा दुर्दैवी दुबळेपणाच अधोरेखित करते.

दादर येथील शिवसेना भवनाच्या इमारतीवर समोरच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या वर दिवंगत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे छायाचित्र आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या वर बाळासाहेबांचे छायाचित्र लावण्याला आक्षेेप घेत संभाजी ब्रिगेडने 2017साली हे छायाचित्र काढून टाकण्याची मागणी केली होती. त्याच संभाजी ब्रिगेडबरोबर युती करीत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. अशा या युतीस काय म्हणावे? शिवसेनेने आजवर कायमच आपण जातीपातीचे भेद मानत नसल्याचा तसेच जातपातविरहित राजकारण करत असल्याचा दावा केला आहे. अशा शिवसेनेवर आज पूर्णपणे जातीपातीच्या मुद्द्यावरच राजकारण करणार्‍या संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याची पाळी आली आहे याहून अधिक दैवदुर्विलास तो काय असू शकतो? 1997 साली स्थापन झालेली संभाजी ब्रिगेड ही आक्रमक संघटना आणि शिवसेना हे आजवर अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठ्यांच्या मूक मोर्चांचा उल्लेख मुका मोर्चा असा केला गेल्यावर संभाजी ब्रिगेडने शिवसेनेच्या काही शाखांची तोडफोडही केली होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माफी मागितल्यावरच संभाजी ब्रिगेडचे आंदोलक शांत झाले होते. याखेरीजही आणखी काही वेळा दादाजी कोंडदेव, राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यांच्या तोडफोडीच्या मुद्यावर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्या संभाजी ब्रिगेडशी आता युती जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही दोघेही शिवप्रेमी असल्यामुळे एकत्र येत आहोत असे प्रतिपादन केले आहे. वास्तविक 2019पासूनच राज्यातील निवडणुकांच्या राजकारणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडला 40 जागा लढवल्यानंतर अवघी 0.06 मते मिळाली होती. उद्धव ठाकरेंना आता इतकी कमी मते मिळवणार्‍या पार्टनरसोबत युती करावी लागते आहे. कारण महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्रही त्यांना सोडून पळून जातील. आज ते कितीही आव आणून महाराष्ट्राला सांगत असले तरी त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत वाईट आहे अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घडामोडीवर टीका केली आहे, तर शिवसेनेचा हा निर्णय अतिशय चुकीचा आणि दुर्दैवी असल्याचे मत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मात्र संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेडला सोबत घेत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या हिंदुत्व रक्षणाच्या भूमिकेबद्दल नेमकेपणाने बोलण्याचे मात्र त्यांनी टाळले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंडखोरांचे जोरदार स्वागतच झाले. अशी खिळखिळी झालेली शिवसेना उद्धव ठाकरे आता कशी सावरणार याकडे लोकांचे लक्ष लागलेले असतानाच त्यांनी एका छोट्याशा संघटनेसोबत युतीचा निर्णय घेऊन जनतेला बुचकळ्यातच टाकले आहे. त्यांचा हा निर्णय शिवसेनेला तारक ठरतो की मारक हे येणारा काळच ठरवेल.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply