आमदार प्रशांत ठाकूर यांची तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळात मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यात कोरोना काळात या महामारीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षानंतरही अद्याप मिळाली नसल्याचे मे 2023मध्ये निदर्शनास आले आहे. एकूण मृतांपैकी अनुदानासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे आठ हजार 542 अर्ज प्रलंबित असल्याचे लक्षात घेता त्यांच्या वारसांना सहाय्य अनुदानित रक्कम तातडीने अदा करणेबाबत तसेच या विलंबास जबाबदार असणार्यांवर कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल करून या संदर्भात शासनाचे लक्ष वेधले.
राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी या प्रश्नावर लेखी उत्तरावर सांगितले की, कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य या योजनेखाली आतापर्यंत 2,09,753 इतक्या पात्र अर्जदारांना रुपये 1048.76 कोटी सानुग्रह सहाय्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजूर केल्यापैकी 8,173 अर्जदारांचा बँक खाते तपशील बरोबर नसल्याने बँकेने प्रदान नाकारले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत संबंधित अर्जदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून अद्ययावत बँक खाते तपशील प्राप्त करून घेऊन सानुग्रह सहाय्याची रक्कम त्यांना प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे.