Breaking News

पूर : महाड, पोलादपूर, माणगावमधून 404 जणांना सुरक्षितस्थळी हलविले

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढले. महाड शहरात बुधवारीही (दि. 7) पूरस्थिती होती. महाड, माणगाव व पोलादपूर तालुक्यातील एकूण 404 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर रायगडात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे, मात्र दक्षिण रायगडात अद्याप पाऊस पडत असल्याने तेथील जनजीवन अजूनही विस्कळीत असल्याचे दिसून येत आहे.

महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यामंध्ये पावसाचा जोर होता. महाड शहरात सावित्री, गांधारी व काळ नद्यांचे पाणी घुसले होते. सतत पाच दिवस महाड शहरात पूर येत असल्यामुळे येथील व्यापार्‍यांसह नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री महाड शहर, आसनपोई, बोराव, तेटघर, नाते येथून 175 लोकांना; माणगाव तालुक्यातील इंदापूर तळाशेत येथील 169, बौद्धवाडीतील 42 व नगरोली येथील सात जणांना; तर पोलादपूर तालुक्यातील माटवण येथून 11 जणांना पुरातून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

पावसाने रायगड जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान 3142.64 मिमी आहे. 6 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी 3313.43 मिमी पाऊस पडला. आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या 105.43 मिमी पाऊस आजपर्यंत पडला आहे. पावसाळ्याचे अजून जवळपास दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे.

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीसाठा मुबलक होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, मात्र अतिवृष्टीने भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे भातपीक धोक्यात येणार आहे. साथीचे रोग पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 100.29 मिमी पावसाची नोंद झाली. माणगाव तालुक्यात सर्वाधिक 316 मिमी पाऊस पडला. तळा येथे 223 मिमी, महाड येथे 210 मिमी, मुरूडमध्ये 161 मिमी, पोलादपूमध्ये 144 मिमी, तर म्हसळा येथे 120 मिमी पाऊस पडला. इतर तालुक्यांमध्ये सुधागड 90 मिमी, रोहा व कर्जत प्रत्येकी 65 मिमी, माथेरान 44.30 मिमी, खालापूर 40 मिमी, उरण 36 मिमी, पेण व श्रीवर्धन 28 मिमी, पनवेल 20.40 मिमी आणि अलिबाग 14 मिमी अशी आकडेवारी आहे. एकूण पाऊस 1604.70 मिमी पडला असून, त्याची सरासरी 100.29 मिमी इतकी आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply