ग्रामविकास अधिकारीच नसल्याने तयारी अपूर्ण
कर्जत ़: बातमीदार
नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवार (दि. 9)पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, मात्र अद्यापही सहापैकी एकाही प्रभागाच्या मतदार याद्या राजकीय पक्षांकडे उपलब्ध नाहीत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकार्याला 30 जुलै रोजी लाच स्वीकारताना पकडल्यापासून नेरळ ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकार्याच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत आहे. थेट सरपंच आणि 17 सदस्यांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक महिना आधी मतदार यादी जाहीर केली जाते, मात्र नेरळ ग्रामपंचायतीची मतदार यादी आजपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पोटात धस्स झाले आहे. आपले मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, इथपासून आपल्या प्रभागातील मतदारांची नावे आहेत की अन्य प्रभागात गेली? याची काळजी त्या सर्वांना सतावत आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे यांना 30 जुलै रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. तेव्हापासून नेरळ ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नाही. कर्जत पंचायत समितीनेदेखील हे ग्रामविकास अधिकारी पद भरले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कराची पूर्तता करता येत नसल्याने इच्छुक उमेदवार अडचणीत आले असून, दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक विभाग मतदार यादी जाहीर करीत नाही, तर कर्जत पंचायत समिती ग्रामविकास अधिकारी देत नाही. ही स्थिती शासकीय यंत्रणांनी तयार केली आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अडचणीत आली आहे.
मतदार यादीसाठी आम्ही आतापर्यंत अनेक फेर्या मारल्या आहेत. आम्ही उमेदवार नक्की केले आणि त्या उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसेल तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मतदार यादी हातात येत नाही तोवर निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा.
-अनिल जैन, अध्यक्ष, नेरळ भाजप
ग्रामविकास अधिकारी नसल्याने इच्छुक उमेदवारांचे कर, ना हरकत दाखले, शौचालय वापर करीत असल्याचे दाखले मिळू शकत नाहीत. नेरळ ग्रामपंचायतीला तत्काळ नवीन ग्रामविकास अधिकारी देणे गरजेचे होते. तसे न करता प्रशासन आमची परीक्षा पाहत आहे.
-बंडू क्षीरसागर, उपशहरप्रमुख, नेरळ शिवसेना
आम्ही चांदोरकर यांच्याकडे नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार दिला आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कारभार सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.
-सुनील आयरे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), कर्जत पंचायत समिती
नेरळ ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या शुक्रवारी (दि. 9) प्रसिद्ध होतील आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर कार्यक्रमानुसार राबविला जाईल. आम्ही आमचे काम व्यवस्थितपणे करीत आहोत.
-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत