Breaking News

प्रभात कोळीचा ‘ऐतिहासिक स्ट्रोक’

मेनलॅन्ड ते अँनाकापा पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू

उलवे नोड : रामप्रहर वृत्त

कॅलिफोर्नियातील सांतबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील 20 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू असलेल्या प्रभातने खांद्याच्या दुखण्यावर मात करीत यशावर शिक्कमोर्तब केले.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 3 जुलै रोजी प्रभातने अँनाकापा ते मेनलॅन्ड अंतर पोहण्यास सुरुवात केली, पण या मार्गात असलेल्या तेलाच्या विहिरीतून निघालेला तेलाचा तवंग पाण्यावर पसरला होता. सुमारे आठ किलोमीटरचे अंतर पोहून गेल्यावर पाण्यावर पसरलेल्या तेलाचा प्रभातला खूप त्रास झाला. पोहत असताना अवघ्या 15 मिनिटांच्या कालावधीत प्रभातला वारंवार उलट्या  होऊ लागल्या. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी प्रभातने पाण्याबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या अपयशामुळे नाउमेद न होता 10 जुलै रोजी प्रभात पुन्हा पाण्यात उतरला आणि त्यात यशही मिळवले. या वेळी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला लागल्याने प्रभातला अपेक्षित वेळ साधता आली नाही. साधरणतः चार फुटाची लाट आणि 13 अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान असताना प्रभातने 20 किलोमीटरचे अंतर 6 तास 20 मिनिटांमध्ये पोहून पार केले.

आतापर्यंत जगभरातील केवळ 14 जलतरणपटूंनी अशी कामगिरी साधली आहे. चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने सातव्या क्रमांकाची वेळ नोंदवली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेकरिता प्रशांत महासागरात सराव करीत असताना प्रभातचा डावा खांदा दुखावला होता, पण या दुखण्यावर मात करीत त्याने यश संपादन केले.

या यशानंतर कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळवण्यासाठी आवश्यक असणारा लेक तहाउमध्ये पोहण्यासाठी प्रभात 17 जुलै रोजी पाण्यात उतरला. कॅलिफोर्नियातील सुमारे 2000 मीटर उंचीवर आणि पाण्याचे तापमान 11 अंश सेल्सिअस असतानाही प्रभातने निर्धाराने 35 किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली, पण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावर प्रभातच्या खांद्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. तरीसुद्धा प्रभातने नेटाने पोहणे चालूच ठेवले, मात्र शेवटच्या टप्प्यात वेदना असह्य झाल्याने दुखणे आणखी वाढू नये म्हणून प्रभातने यश समोर दिसत असतानाही माघार घेतली. या दुखण्यावर योग्य ते उपचार घेतल्यावर पुढील वर्षी प्रभात पुन्हा एकदा पोहण्यासाठी लेक तहाउमध्ये उतरणार आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply