33 गावे आणि 148 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट नसले तरी पाणीटंचाईची समस्या मात्र जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांतील एकूण 33 गावे आणि 148 वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातील 10 गावे आणि 74 वाड्यांमध्ये एकूण 22 हजार 586 नागरिकांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील चार गावे आणि दोन वाड्यांत एकूण 2 हजार 896 नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीच्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील पाच गावे आणि 37 वाड्यांमधील एकूण दोन हजार 365 नागरिकांना चार खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर पोलादपूर तालुक्यातील 14 गावे आणि 35 वाड्यांमध्ये एकूण एक हजार 590 नागरिकांना पाच खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्केपाटील यांनी दिली.