Breaking News

शांततेसाठी कसोशीचे प्रयत्न

खोर्‍यात आज सकाळी निरनिराळ्या मशिदींमध्ये ईदसाठीचा विशेष नमाज शांततेत पार पडला. श्रीनगरसह खोर्‍यातील निरनिराळ्या भागांत लोक बर्‍यापैकी संख्येने नमाजसाठी बाहेर पडले. लोकांना आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाजकरिता जाता येईल हे प्रशासनाकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले होते. खोर्‍यात कुठेही कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आज सांगण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेकडून अनेक भागांत मिठाईचे वाटप देखील करण्यात आले.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतरची पहिली ईद आज काश्मीर खोर्‍यात साजरी झाली. गेली अनेक दशके फुटीरतावादातून जन्मलेल्या असंतोषाच्या आगीत काश्मीर खोरे होरपळताना आपण पाहात आलो आहोत. या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कलम 370 मागे घेण्याचा जालीम अपाय केला जायला हवा, अशी मागणी देशभरातील अनेक घटकांकडून दीर्घ काळ केली जात होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हे वादग्रस्त कलम मागे घेण्याची धडाडी नुकतीच दाखवली. त्यानंतर लगेचच येणारी ही ईद काश्मीर खोर्‍यात कशी साजरी होते याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले होते. कलम 370 मधून प्राप्त झालेला विशेष दर्जा हा काश्मिरी जनतेसाठी मोठा भावनिक मुद्दा होता याची जाणीव काश्मीरच्या तमाम अभ्यासकांना आहे. त्यामुळेच आजची ईद काश्मीर खोर्‍यात शांततेत पार पडणे महत्त्वाचे होते. सरकारची खोर्‍यातील परिस्थितीवरची पकड किती घट्ट आहे हे देखील यातून स्पष्ट होणार होते. बारामुल्ला येथे तब्बल 10 हजार लोकांनी तर अनंतनाग येथे 3 हजार लोकांनी नमाज पढल्याचे केंद्रीय गृहखात्याने घोषित केले आहे. कुपवारा, पुलवामा आदी संवेदनशील भागांतही नमाज पढला गेला. जम्मू येथेही सुमारे 5 हजार लोकांनी नमाज पढला. संपूर्ण खोर्‍यात कुठेही आज सुरक्षा दलांकडून एकही गोळी झाडली गेलेली नाही, तसेच कुठेही कुणाचाही अनुचित घटनेत बळी गेलेला नाही, असे गृह खात्याने स्पष्ट केले आहे. ईदच्या सणानिमित्त लोकांना खरेदी करता यावी म्हणून रविवार संध्याकाळपासूनच निर्बंध काहिसे शिथिल करण्यात आले. अर्थात या सणाच्या निमित्ताने जाणवणारी नेहमीची वर्दळ यंदा खोर्‍यात दिसली नाही. निर्बंधांमुळे लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी याची काळजीही प्रशासनाकडून घेतली गेली. अन्नपदार्थ तसेच इतर गरजेच्या गोष्टी पुरेशा प्रमाणात अपलब्ध व्हाव्यात यासाठीची विशेष दक्षताही प्रशासनाकडून घेण्यात आली. खोर्‍यात शांतता कायम रहावी व कुठेही कुठल्याही स्वरुपाचा अनुचित प्रकार घडता कामा नये याला प्रशासनाकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. कलम 370 मागे घेतल्यानंतर खोर्‍याच्या विकासाला आणि तेथील शांततेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. सुमारे तीन दशके फुटीरतावादाच्या आगीत होरपळल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित व्हावी असे कुणाला वाटत असेल तर त्यात तेथील सर्वसामान्यांचा अल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. तिथल्या अनिश्चिततेच्या आणि नाजूक परिस्थितीत तिथे गुंतवणूक करण्यासाठी कुठले अद्योजक पुढे सरसावतील या प्रश्नाचे अत्तर तर आताच देणे शक्य नाही. परंतु शांतता प्रस्थापित करण्याचा आणि राखण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून कसोशीने सुरू आहे याचे दर्शन मात्र आजच्या ईदच्या निमित्ताने निश्चितच घडले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply