Breaking News

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, असे आपण दरवर्षी मराठी भाषा दिनी अभिमानाने म्हणतो. जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा  दिन साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला.

मराठी भाषेच़े वय हे साधारणपणे 1500 वर्ष मानले ज़ाते. या काळात समाजजीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले ज़ाते. मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. ‘अमृतासही पैजा जिंके’ अशा शब्दांत ज्ञानेश्वरांनी या भाषेचं कौतुक केलं होतं. जसा काळ बदलतो तसे भाषेमध्येही बदल होतात. बोली भाषादेखील तितक्याच समृद्ध आहेत. त्याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट बोली भाषेमुळे आपण विशिष्ट प्रांतांची ओळख मोठी करतोय असं त्याच्याकडे पाहून त्याचा संवर्धन करणं आवश्यक आहे. मराठी भाषेच़ा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झ़ालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झ़ाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेच़ा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झ़ाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपीमधून लिहिली ज़ाते. इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथांची भर घातली.

इ.स. 1250 ते इ.स. 1350 असे देवगिरीच्या यादवांच़े महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङ्मयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याच़े दालन वैविध्यानी समृद्ध केले. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांच़ा काळ सुरू झ़ाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झ़ाल्याने मराठी भाषेत ‘तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांच़े आगमन झाले. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णुदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.

शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. या काळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या, तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोच़वल्या. याच़ काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झ़ाली.

इ.स. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेच़ा दर्जा दिला. इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेच़ा मुकूट प्राप्त झाला. राजा केसिदेवराय याचा कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात ज़ुना आज़पर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख- चामुण्डराजे करवियले हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समज़ला ज़ात असे. ती समज़ूत आता मागे पडली असून तो मान आक्षी शिलालेखाला मिळाला आहे. आक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याचा ठिकाणापासून दक्षिण दिशेस 5 किमी अंतरावर अलिबाग-मुरूड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाच़ा उल्लेख 1883च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे.

मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली ज़ाते. 2 त्याच़बरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली ज़ाते.

भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली ज़ाते. त्याच़बरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली ज़ाते. मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद (गुजरात), बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार (कर्नाटक), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू) वगैरे. देशातील 36 राज्ये आणि 72 देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतर अनेक देशांमध्येही मराठी भाषा बोलण्याचे वाढत आहे.

भारताचा राज्यघटनेतील 22 अधिकृत भारतीय भाषांचा यादीत मराठीच़ा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीच़ा वापर शासनाचा सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणार्‍या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांच्या सोयीसाठी इंग्रजीतून केला जातो. दादरा व नगर हवेली 4 या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

मराठी भाषेचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तिच्या बोलीभाषा. मुंबई, पुणे नाशिक अशा महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये अनेक जण प्रमाण भाषेतील मराठीमध्ये बोलतात, पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये दर 12 कोसानंतर संस्कृती बदलते आणि सोबतच भाषादेखील बदलते. मराठीप्रमाणेच प्रदेशागणिक बदलत जाणार्‍या बोली भाषेची एक वेगळी ओळख आहे. काही लोकांची त्यावरून थट्टा होते, पण आजकाल सिनेमा, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये बोली भाषेचा वापर वाढल्याने आता प्रांताच्या सीमा पुसट होऊन अनेकांनी ते शब्द नेहमीच्या बोलण्यात वापरायला सुरुवात केली आहे. मराठी ही एक समृद्ध भाषा असली, तरीही त्याच्या 13 खास बोलीभाषांची मज्जादेखील काही और आहे.   मध्य कोकणात प्रामुख्याने आगरी भाषा बोलली जाते. कोळी बांधवांमध्ये ही भाषा प्रामुख्याने आढळते त्यामुळे रायगड, ठाणे या भागात अनेक जण आगरी भाषेमध्ये बोलतात. कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभागावर या भाषेचा प्रभाव असल्याने कोल्हापूर शहरामध्ये ही भाषा बोलली जात असते. यामध्ये हेल, सूर आणि व्याकरण वेगळे आहे. बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. ‘ड’चा ‘ळ’, ‘ळ’चा ‘य’ म्हणून वापर केला जातो. भिल्ल समाज प्रामुख्याने देहवाली भाषेत बोलताना तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. देहवालीच्या मूळ स्वरात ‘ळ’, ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही व्यंजने नाहीत, तर ‘छ’, ‘श’ आणि ‘ष’ यांच्याऐवजी ’स’ हे एकच व्यंजन वापरले जाते. धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. मुळात रांगडेपणा हीच कोल्हापूरची ओळख असल्याने त्यांच्या भाषेमध्येदेखील याचा रांगडेपणा दिसून येतो. थोडी खेडवळ आणि तरीही लय काढून बोलण्याची पद्धत असल्याने त्याला खास गोडवा आहे. मराठी भाषांच्या विविध प्रकारांमध्ये पुणेरी मराठी ही व्याकरणशुद्ध म्हणून ओळखली जाते. सहित्य, कलाकार विद्यानगरीमध्ये राहत असल्याने त्याचा प्रभाव येथील स्थानिकांवर दिसून येते. बेळगाव हादेखील सीमाभागावरचा एक प्रांत आहे. कन्नड, चंडगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा सगळ्याच भाषांची येथे भेसळ आहे. अनेक साहित्यिकांना बेळगावी भाषेचा त्यांच्या साहित्यामध्ये समावेश करण्याचा मोह आवरला नाही. उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात किनार्‍यालगतच्या भागात वाडवळी बोली भाषा बोलली जाते. वसई भागातील स्थानिक प्रामुख्याने या भाषेचा वापर करतात. आपण ‘जागतिक मराठी भाषा दिन’ साजरा करतो खरे, पण आपल्यापैकी किती लोकांना मराठी भाषेच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती असते. केवळ 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेत प्रतिभासंपन्न साहित्य निर्मिती करणार्‍या साहित्यिकांपैकी एक म्हणजे विष्णू वामन शिरावाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा हा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो इतकीच जुजबी माहिती अनेक मंडळी देत असतात.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply